Satara Crime : ज्वेलर्स दुकान फोडणारे सहा तासांत जेरबंद

सातार्‍यातील घटना; ९ लाखांचा ऐवज हस्तगत
Theft
Theft Pudhari
Published on: 
Updated on: 

सातारा : सातार्‍यातील शेटे चौकातील ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून त्‍यातून तब्बल ९ लाख १५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरणार्‍या टोळीला शहर पोलिसांनी अवघ्या ६ तासांत जेरबंद केले. संशयित तिघेजण सातार्‍यातील असून त्‍यात एकजण अल्‍पवयीन आहे.

रेहान अन्‍वर शेख (वय २०, रा. शनिवार पेठ, सातारा) व शुभम सुरेश हदगे (वय १९, रा. केसरकर पेठ, सातारा) अशी संशयितांची नावे असून अल्‍पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकणी अक्षय अंकुश शिंदे (वय ३१, रा. पाटखळ ता. सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. ७ ऑक्‍टोबर रोजी मध्यरात्री घडली. संशयित टोळीने अवधूत ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटले. दुकानातून चोरट्यांनी १ लाख ३० हजारांच्या सोन्‍याच्या अंगठ्या, सव्‍वा लाखाच्या नाकातील चमक्‍या, १ लाख ५३ हजारांचे चांदीचे पैंजण, १ लाख ५३ हजारांची चांदीची जोडवी, ५५ हजारांचे चांदीचे कडे, ३३ हजारांच्या लहान-मोठ्या मूर्ती, छल्‍ले, राशी खडे, करदोडा असा ऐवज चोरी केला. चोरीची घटना दुसर्‍या दिवशी समोर आल्‍यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्‍या या घटनेनंतर शहर पोलिसांनी पंचनामा करून तत्‍काळ तपासाला सुरुवात केली. तांत्रिक, पारंपरिक माहिती याद्वारे तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्‍ही फुटेजमध्ये काही संशयित दिसले. त्‍यानुसार पोलिसांनी त्‍यांची धरपकड केली. त्‍यांनी चोरीची कबुली दिली.

देव राहिले.. डीव्‍हीआर, सीसीटीव्‍ही चोरला..

ज्वेलर्स दुकानात सीसीटीव्‍ही होते; मात्र चोरी करताना चोरट्यांनी डीव्‍हीआर, सीसीटीव्‍ही असा मशिनचा सर्व सेटदेखील चोरी केला असल्‍याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांना प्राथमिक तपासामध्ये अडथळा आला. दरम्‍यान, ज्वेलर्स दुकानात इतर घबाड मिळाल्‍याने चांदीच्या देवांच्या मूर्ती मात्र चोरट्यांनी तशाच ठेवल्‍या होत्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news