

सातारा : कुरिअर कंपनीच्या पिकअप वाहनाला कवठे (ता. वाई) गावच्या हद्दीत अडवून कोयत्याचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा लुटणाऱ्या ८ जणांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. सातारा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत कामगिरी करुन दीड कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला.
गोपीनाथ तानाजी कदम, मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, आदित्य हणमंत कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, निखील दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर (सर्व रा.मालगाव ता.सातारा) व निषीध शरद साबळे (रा.शिवथर ता.सातारा) अशी दरोडेखोरांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), भुईंज आणि वाठार पोलिसांच्या संयुक्त तपासामुळे या दरोड्याचा पर्दाफाश झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची पिकअप पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या वाहनात सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा होत्या. ही माहिती असलेल्या संशयित आरोपींनी खेड शिवापूर आणि कापूरहोळ येथून तीन मोटारसायकलींवरून पिकअपचा पाठलाग केला. कवठे गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकल आडवी मारून पिकअप थांबवून चालकाला कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला.
दरोड्यातील चोरटे पिकमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा असलेले पोते घेऊन पसार झाले. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांच्या या तपासावेळी काही संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्यास सुरुवात केली. संशयितांनी चोरीची कबुली देवून मुद्देमाल पोलिसांना दिला.
एसपी निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, प्रोबेशनरी डीवायएसपी पूनम झगडे, पोनि विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पृथ्वीराज ताटे, सपोनि सुशील भोसले, सपोनि राजेश माळी, सपोनि अभिजीत यादव, सपोनि रोहित फार्णे, फौजदार परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, सुरज शिंदे, आकाश मोरे, पोलिस राजू मुलाणी, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, हणमंत भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
कुरिअरवाला फुटला अन् दरोडा पडला...
संशयितांमधील गोपीनाथ कदम हा कुरिअरमध्ये कामाला आहे. त्याच्याकडून कोणत्या वाहनातून कधी काय काय जाते हे समजले. यातूनच पुढे संशयितांनी मिळून प्लॅन केला. यातील सात जणांवर पहिले कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. त्यांनी पहिल्यांदाच हा दरोडा टाकल्याचे तपासात समोर आले आहे.