

खटाव : बदल्याची आणि जखमा भरण्याची भाषा करणाऱ्यांच्यात दम होता तर त्यांनी समोरासमोर लढाई करायची होती. मुख्यमंत्री बरोबर नसते तर तुमचे काय झाले असते याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्ला मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना दिला.
ते म्हणाले, माझा राजकारणातील जन्मच फार मोठ्या संघर्षातून झाला आहे. माझ्या आयुष्यातील कोणताच संघर्ष मी अर्धवट सोडला नाही. त्यामुळे असे संघर्ष मी भविष्यातही करत राहीन. मी कधीही जबाबदारी झटकत नाही. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आणि पदाधिकारी निवडीतील पराभवाची जबाबदारी कुणी घ्यायची गरज नाही. ती जबाबदारी माझी आहे. सत्ता असो किंवा नसो, मी कायमच लढत आलो आहे आणि यापुढेही लढत राहीन. मुख्यमंत्र्यांनी महायुती केली म्हणून त्यांच्या कृपेने आजचे चित्र उभे राहिले आहे हे कुणी विसरू नये.
जिल्हा बॅंक निवडणूक आणि परवा झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, आजपर्यंत भाजप पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी इमाने इतबारे पार पाडली आहे. मी सत्ता असो किंवा नसो, कायमच लढत आणि संघर्ष करत आलो आहे. भविष्यातही माझी लढाई सुरूच राहणार आहे. बॅंक निवडणुकीत आणि पदाधिकारी निवडीत काय घडले या सर्वच राजकीय गोष्टी उघड पटलावर आणायच्या नसतात. वेळ आली तर त्याही गोष्टी समोर आणल्या जातील. मी महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला. ज्यांनी महायुती धर्म पाळला नाही त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जिल्हा बॅंक निवडणूक स्वतंत्र लढण्याचा माझा सुरुवातीपासून आग्रह होता.
दुसरीकडे ही निवडणूक समन्वयाने लढावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कुणी कुणी विनवण्या केल्या, जागा वाटपासंदर्भात कुणी कुणी त्यांच्याकडे आर्जव केले त्यांनी थोडे आत्मपरीक्षण करावे. ही निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढवण्याची माझी सातत्याने तयारी होती. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतील कटूता, संघर्ष कमी व्हावा म्हणून मी त्या सूचनांची अंमलबजावणी केली. महायुती करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी कधीच बोललो नव्हतो. ज्यांनी महायुती करण्यासाठी विनवण्या केल्या त्यांनीच महायुतीशी बेईमानी केली. बॅंकेतील संचालकांच्या जागा भाजपच्या मतांवर निवडून आल्या आहेत.
पदाधिकारी निवडी भाजपने निवडून दिलेल्या सदस्यांच्या ताकदीवर झाल्या आहेत. स्वतःच्या ताकदीवर पदाधिकारी निवडी करण्याची हिंमत त्यांच्या कुणाच्यातही नव्हती. ज्यांना भळभळणाऱ्या जखमा बऱ्या करायच्या होत्या त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची होती. त्यांनी स्वतःच्या ताकदीवर विजय मिळवला असता तर त्यांचे कौतुक केले असते.
ना. गोरे म्हणाले, महायुती असताना भाजपचे उमेदवार अर्जुन काळे यांना पाडण्याचे प्रयत्न सर्व बाजूंनी झाले. महायुती धर्माला तिलांजली देण्यात आली. प्रत्येक मतदारसंघात काळेंना पडलेली मते साक्षीदार आहेत हे कुणी विसरू नये. इतक्या अडचणीतून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळेंना निवडून आणले. यावरून आम्ही भाजप म्हणून स्वतंत्र लढलो असतो तर आरक्षित सर्व जागा जिंकल्या असत्या हे स्पष्ट दिसत आहे. काळेंच्या विजयावरून जिल्ह्यात कुणाची किती ताकद आहे हे दिसले आहे. मोजक्या कार्यकर्त्यांच्या जीवावर हजारांपर्यंत मते काळेंनी घेतलीत हे कुणी विसरू नये. वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील भाजपचा माझा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी ताकदीने लढला. फलटणमध्ये रणजितसिंहांनी अशक्य वाटणारी निवडणूक टप्प्यात आणली. त्यांनी खूप संघर्ष केला. कराड उत्तर, पाटण, कोरेगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकाकी खिंड लढवली. आ. महेश शिंदेंनी खूप ताकद लावली. तिथे आम्हाला चिठ्ठीवर अपयश आले. सगळ्या शक्तींविरोधात पाटणकरांनी पाटणमध्ये दिलेली लढत लक्षवेधी होती. मी बॅंकेच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठाम उभा राहिलो याचा मला अभिमान आहे.
निवडणुकीतील जय-पराजय मी खूप अनुभवले आहेत. मी कोणताही संघर्ष अर्धवट सोडला नाही. त्यामुळे असे अनेक संघर्ष मी भविष्यातही करत राहीन. माझ्या सहकाऱ्यांसाठी कायम लढत राहीन. आताचा आमचा पराभव हा पराभव नाही. समोर येऊन आमच्याशी लढून आमचा पराभव केला असता तर तो मान्यही केला असता, पण महायुतीत लढून, आमच्या मतांवर निवडून येऊन विश्वासघाताने मिळवलेला विजय हा मिरवण्यायोग्य कधीच असू शकत नाही. दम होता तर त्यांनी मैदानात समोरासमोर लढायचे होते. त्यानंतर विजय मिळाला असता तर बदला घेण्याची आणि जखमा भरण्याची भाषा त्यांना करता आली असती.
आज त्यांना मिळालेला विजय, झालेल्या पदाधिकारी निवडी तुमच्या कष्टामुळे नाही तर मुख्यमंत्र्यांनी महायुती केल्यामुळे झाल्या आहेत. त्याचे श्रेय तुम्ही घ्यायचे कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी महायुती केली नसती तर चित्र वेगळे दिसले असते. बॅंक पदाधिकारी निवडीत जे झाले त्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मी आयुष्यभर शिकत आलो आहे. या निवडणुकीतही शिकलो. हा अनुभव कायम माझ्या गाठीशी राहणार आहे. खा. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे सर्व आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा बॅंक निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांचा मी आदर करतो. कोणताही पराभव हा अंतिम नसतो हे मी पुन्हा एकदा सांगतो. सगळे अनुभव गाठीशी घेऊन ही लढाई पुन्हा ताकदीने लढणार असल्याचा विश्वासही ना. गोरे यांनी व्यक्त केला.