Satara Drought : जावलीत फुलोऱ्यातील भातशेती करपली; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

शेतकरी वर्ग संतप्त
Satara Drought : जावलीत फुलोऱ्यातील भातशेती करपली; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Published on: 
Updated on: 

केळघर : जावली तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने फुलोऱ्यावर आलेली भातशेती करपू लागली आहे. ओढे, नाले आणि नद्या आटू लागल्याने शेतीसह भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी. दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याचा लेखी आदेश तातडीने जाहीर करावा, अशी संतप्त मागणी जावलीतील नागरिकांसह केळघर परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

जावली तालुक्यात पावसाअभावी भातपिके करपू लागली आहेत. भातशेती फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पाऊस न पडल्यास दाणे भरण्याची प्रक्रिया बाधित होऊन उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. यंदा उत्पन्नात ८० ते ९० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.

दुष्काळी परिस्थितीबाबत महसूल विभागाकडे विचारणा केली असता, वरिष्ठ स्तरावरून आदेश प्राप्त झाला नसल्याने कार्यवाही करता येत नसल्याचे उत्तर मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने केवळ आदेशाची वाट न पाहता प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करावी. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी बाधित भागांचा दौरा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाला सादर करावा, अशी मागणी होत आहे.

यापूर्वी नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना छायाचित्रे, पंचनामे, आधारकार्ड, बँक पासबुक आणि अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी खर्च करावा लागला. मात्र, प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन रुपये, तर काहींच्या खात्यावर १० ते २० रुपये इतकी अत्यल्प भरपाई जमा झाल्याचे अनुभव आहेत. त्यामुळे कागदपत्रे गोळा करण्यासाठी झालेल्या खर्चाएवढीही भरपाई मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांत आहे.

यंदा भातपीक फुलोऱ्यावर असतानाच करपू लागल्याने नुकसान स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीत केवळ मेजर टेप घेऊन भाताच्या सडांची मोजणी, छायाचित्रे आणि औपचारिक पंचनामे करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळेल, अशी ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष मदत आणि ठोस निर्णयांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी जावलीतील नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news