Satara Drought : जावलीत अखेर दुष्काळ जाहीर

ना. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्याला यश : शेतकऱ्यांना दिलासा
Shivendraraje Bhosale
Shivendraraje bhosalePudhari Photo
Published on: 
Updated on: 

मेढा : जावली तालुक्याचा अखेर टिगर-२ अंतर्गत अंतिम दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या कमतरतेमुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जावलीतील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे शासकीय मदतीची आशा निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जावली तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट व्हावा, यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने जावली तालुक्यातील शेतीपिकांवर मोठा परिणाम झाला. भात, सोयाबीन यांसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले. पावसाअभावी शेतीचे आर्थिक गणित बिघडले असताना दुष्काळग्रस्तांच्या यादीत तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे जावलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी जोर धरत होती.

तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आणि दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन ना. शिवेंद्रराजे यांनी हा प्रश्न शासनदरबारी सातत्याने मांडला. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे वंचित राहिलेल्या अन्य तालुक्यांचाही समावेश दुष्काळी तालुके म्हणून केला जाईल, असा शब्द शिवेंद्रराजेंनी जनतेला दिला होता. त्यांनी यासंदर्भात महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासोबत चर्चा केली होती. तसेच, तातडीने हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यासाठी राज्य सरकरकडे त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने जावली तालुक्याचा टिगर-२ अंतर्गत अंतिम दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला आहे.

शिवेंद्रराजे यांनी जावलीच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे जावलीतील शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय मिळाल्याचे मानले जात आहे. दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यामुळे शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना विविध सवलती आणि मदतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जासंदर्भातील उपाययोजना, कृषीपंपांच्या वीजबिलात सवलत, तसेच पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश असू शकतो. संबंधित शासन निर्णय आणि पात्रतेच्या अटींनुसार इतर सवलतीही मिळू शकतात.

मात्र, या सवलतींचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. पिकांच्या नुकसानीची नोंद, पात्र लाभार्थ्यांची माहिती आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी याकडे महसूल व कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी मानले ना. शिवेंद्रराजेंचे आभार

जावली तालुक्याचा अंतिम दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शेतकऱ्यांकडून आभार मानले जात आहेत. तसेच ना. शिवेंद्रराजे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news