

सातारा : श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज यांनी सातार्याच्या विकासाची पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. सातारकरांनी नेहमीच राजघराण्यावर प्रेम केले. सेवा करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहे. सातार्यात उद्योगधंदे आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. सातार्याच्या आयटी पार्कचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. त्यासाठीची जागा हस्तांतरण प्रक्रिया लवकरच पार पडेल, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोडोलीतील आयुर्वेदिक गार्डनमध्ये सातार्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज यांच्या स्मृतीस खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी स्व. श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज लायब्ररीचे उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयटी पार्कबाबत पत्रकारांनी विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, आयटी पार्कचा प्रस्ताव शासनास दिला आहे. इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी त्यांच्या हुबळी गावी आयटी पार्क सुरू केले. मात्र त्याठिकाणी त्यांना कनेक्टीव्हिटीची समस्या आली. पुण्यात जागा उपलब्ध नाही. सातारा एमआयडीसीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. एका खात्याची जागा दुसर्या खात्याकडे वर्ग करण्याचे काम राहिले आहे. सातार्यात नक्की आयटी पार्क करणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.
ते म्हणाले, शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचे काम येथील लायब्ररीच्या माध्यमातून झाले आहे. आयुर्वेदिक गार्डनमध्ये विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा नागरिकांना नक्की फायदा होईल. स्व. प्रतापसिंह महाराज यांचे निधन होऊन 46 वर्षे झाली. दुर्देवाने त्यांना अल्प आयुष्य मिळाले. सातार्यासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत. ना. शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे सातारा शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत. लोकप्रनिधींकडून नागरिकांना असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील.
सातार्याच्या जुन्या राजवाड्याला झळाळी मिळणार का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, त्यासाठी स्वत: पाठपुरावा करत आहे. या राजवाड्यात कोर्ट असताना त्याची देखभाल दुरूस्ती होत होती. त्याचे काम सार्वजनिक बांधकाम करत होते. ही वास्तू अत्यंत सुंदर आहे. मात्र त्याचे कारंजे तोडले आहेत. ते पूर्वीसारखे होणार नाहीत. केंद्र शासनाकडे राजवाड्याबाबत प्रस्ताव का पाठवला माहित नाही? ही ऐतिहासिक वास्तू आहे. राजवाड्यात आताचे संग्रहालय झाले असते तर ते अत्यंत चांगले झाले असते. त्यामुळे देखभाल झाली असती. बिल्डींगच्या रेड फोर्टमध्ये साऊंड अॅण्ड लाईट शो असतो. विदेशी पर्यटकांना ऐतिहासिक बाबींमध्ये रूचि असते. त्याठिकाणी अभ्यासिका, मराठा इतिहासावर व्याख्यानांचे आयोजन करता येईल. मात्र मध्यंतरी शासनाकडून उशिर झाला. राजवाड्याबाबत तातडीने पावले न उचलल्यास तो ढासळून जाईल, अशी भीती खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
अॅड. डी. जी. बनकर म्हणाले, सातार्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त गोडोलीतील आयुर्वेदिक गार्डनमध्ये नागरिकांसाठी वेगळे दालन सुरू करण्याचा संकल्प खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. प्लेग्राऊंड, महिलांसाठी जीम, लहान मुलांसाठी खेळणी, व्याख्याने, लेझर शो, अॅक्वालेझर शो सुरू झाला आहे. गोशाळा सुरू केली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अद्ययावत स्व. श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज लायब्ररी तयार करण्यात आली आहे. या लायब्ररीचा शुभारंभ खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, प्रशांत आहेरराव, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, विजय बडेकर, कल्याण राक्षे, धनंजय पाटील, विकास गोसावी, संग्राम बर्गे, अॅड. विनीत पाटील, आदि उपस्थित होते.