Satara News : आयटी पार्क जागा हस्तांतरण अंतिम टप्प्यात

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जागा एमआयडीसीच्या ताब्यात
Satara News
आयटी पार्क जागा हस्तांतरण अंतिम टप्प्यात
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी आयटी पार्क प्रकल्पासाठी नागेवाडी (ता. सातारा) येथील महसूल विभागाची ४२.५५ हेक्टर जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या जागेवरील खाणी बंद केल्यानंतर आठ खाणपट्टेधारकांची देणी अदा करून त्याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाला प्राप्त झाल्यानंतर हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही जागा एमआयडीसीच्या ताब्यात देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सातारा-पुणे-बंगळुरू महामार्गावरील लिंब खिंडीनजीक नागेवाडी येथील गट क्रमांक ३०८/१ मधील ४२ हेक्टर ५५ आर क्षेत्र आयटी पार्कसाठी आरक्षित करण्यात आले आहे. एमआयडीसीकडून या जागेचा ड्रोन सर्व्हे पूर्ण करण्यात आला असून, त्यानंतर जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी सातारा एमआयडीसीने नुकतेच २ कोटी ५३ लाख रुपये महसूल विभागाला अदा केले आहेत. मात्र, या जागेवर पूर्वी सुरू असलेल्या खाणी बंद करण्यात आल्याने आठ खाणपट्टेधारकांची देणी परत करणे आवश्यक आहे. त्यानंतर गौण खनिज विभागाचा अहवाल महसूल विभागाला प्राप्त झाल्यावर हस्तांतरणाची पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अनेक वर्षे सुरू असलेल्या खाणींमुळे या परिसरातील डोंगर पोखरले गेले आहेत. त्यामुळे आयटी पार्कसाठी ही जागा निश्चित केल्याने खाणी बंद करण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळाली आहे.

दरम्यान, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे महसूल विभागातील काही कामांवर परिणाम झाला असून, हस्तांतरण प्रक्रियेला काहीसा विलंब होत आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाकडून जागेबाबतची आवश्यक कार्यवाही वेगाने सुरू आहे. जागा वेळेत एमआयडीसीच्या ताब्यात गेल्यास सप्टेंबरपासून सपाटीकरणाच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. आयटी पार्कमुळे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

अतिक्रमणे हटवण्याचे आव्हान

आयटी पार्कसाठी निश्चित केलेल्या जागेवर काही ठिकाणी अतिक्रमणे झाली असून, पक्की घरेही उभारण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे हटवण्याचे आव्हान एमआयडीसीसमोर राहणार आहे. त्याचबरोबर खाणींमुळे असमतल झालेल्या जागेचे सपाटीकरण करणेही मोठे काम आहे. त्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करुन जागा एमआयडीसीच्या ताब्यात देण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news