Satara News : जलसंपदाचे सातारा सिंचन मंडळ कार्यालय बंद होणार

महामंडळांतर्गत विविध कार्यालयांची पुनर्रचना; सिंचनासाठी एकच मंडळ कार्यालय
Satara News
Satara News
Published on
Updated on

अजय कदम

खेड : मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे या प्रदेशांतर्गत असलेल्या सातारा सिंचन मंडळ कार्यालयाकडील संपूर्ण कार्यभार तसेच त्यांच्या अंतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयांचा कार्यभार अधिक्षक अभियंता सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्याकडे हस्तांतरित करून सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय बंद करण्यात येणार आहे. तर कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध कार्यालयांचे स्थलांतर व पुनर्रचना करण्यात येऊन जिल्ह्यात बांधकाम व सिंचनासाठी एकच मंडळ कार्यालय ठेवण्यात येणार असल्याने जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या विविध कार्यालयांचे स्थलांतर, पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे या प्रदेशांतर्गत असलेल्या धोम कालवे विभाग क्रमांक 2 सातारा हे विभाग कार्यालय तर त्या अंतर्गत 13 उपविभाग कार्यालय बंद करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळातंर्गत असलेल्या कार्यकारी अभियंता धोम कालवे विभाग क्रमांक 2 मधील धोम डावा कालवा उपविभाग क्रमांक 5, उपविभाग क्रमांक 7, तसेच कण्हेर भूमी संपादन व पुनर्वसन उपविभाग, कृष्णानगर वसाहत उपविभाग आणि लघुपाटबंधारे उपविभाग सातारा ही उपविभाग कार्यालये बंद होणार आहेत. या विभागाकडील कामे बंद व पूर्ण होत आली असल्याने हा विभाग बंद करण्यात येणार असल्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर या विभागांतर्गत असलेल्या उपविभागाकडील कृष्णानगर वसाहतीचा व वांगणा उपसा सिंचन योजनेचा कार्यभार लघुपाटबंधारे विभाग सातारा व कुडाळी प्रकल्पाचा कार्यभार धोम - बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळातंर्गत असलेला कण्हेर कालवे विभाग क्रमांक 2 करवडी ( कराड ) अंतर्गत आरफळ कालवे उपविभाग क्रमांक 7 करवडी हा उपविभाग कण्हेर कालवे उपविभाग क्रमांक 9 करवडी या उपविभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. तर कण्हेर कालवे विभाग क्रमांक 2 करवडी अंतर्गत कण्हेर कालवे उपविभाग क्रमांक 12 नागठाणे या उपविभागाचा कार्यभार उजनी कालवे उपविभाग क्रमांक 24 नागठाणे - करवडी ( कराड ) यांच्याकडे तसेच कोयना पुनर्वसन उपविभाग क्रमांक 1 कोयनानगर या उपविभागाचा कार्यभार आरफळ कालवे उपविभाग क्रमांक 5 करवडी यांच्याकडे वर्ग करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

उरमोडी धरण विभाग सातारा या कार्यालयाचे मुख्यालय लाभक्षेत्र कार्यक्षेत्रात असणे आवश्यक असल्याने हा विभाग नागठाणे (ता. सातारा) येथे तर जिहे -कठापूर उपसा सिंचन विभाग साताराचे विभागीय कार्यालय नेर (ता. खटाव) येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.

सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळातंर्गत असलेल्या धोम कालवे विभाग क्रमांक 2 अंतर्गत धोम डावा कालवा उपविभाग क्रमांक 4 सातारा हे कार्यालय स्थलांतरित करणे प्रस्तावित नसल्याने ते जिहे -कठापूर उपसा सिंचन विभाग सातारा या विभागाकडे तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रण सोपवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध कार्यालयांची पुनर्रचना, बंद, स्थलांतरित व प्रशासकीय नियंत्रणातील बदलाने सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व सातारा सिंचन मंडळ, धोम कालवे विभाग येथील कर्मचाऱ्यांच्या मध्ये खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांची द्विधा स्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news