

सातारा : सातारा जिल्ह्यात विनापरवाना शेतमाल खरेदीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असून ग्रामीण भागात फिरून व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून कमी दराने माल खरेदी करत असल्याचे चित्र आहे. या बेकायदा व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून बाजार समित्यांचाही महसूल बुडत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
जिल्ह्यात हळद, आले, सोयाबीन, ज्वारी, गहू, तांदूळ यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र काही व्यापारी कोणताही अधिकृत परवाना नसताना वाहने घेऊन थेट गावागावांत जात आहेत. शेतकऱ्यांना रोख पैशांचे आमिष दाखवून किंवा बाजारभावापेक्षा कमी दरात तत्काळ व्यवहार करून शेतमालाची खरेदी केली जात असल्याची तक्रार आहे.
शेतकऱ्यांना बाजार समितीत माल नेण्यासाठी वाहतूक, हमाली, वेळ आणि इतर खर्च करावे लागतात. याच अडचणींचा फायदा घेत काही व्यापारी थेट शेतात किंवा गावामध्ये जाऊन माल खरेदी करत आहेत. मात्र, अशा व्यवहारांमध्ये अधिकृत लिलाव प्रक्रिया होत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य बाजारभाव मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. बाजार समितीमार्फत व्यवहार झाल्यास मिळणारे बाजार शुल्क आणि इतर महसूल थेट बुडत असल्याने समित्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या या अनधिकृत खरेदीमुळे अधिकृत व्यापाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.