

म्हसवड : माण तालुक्यातील हिंगणी गावच्या हद्दीतील आसाळवाडा जि.प.शाळेच्या पाठीमागे असलेल्या घुटुकडे वस्तीवर पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून पतीने जीवन संपवले. बंडू अंकुश घुटुकडे (वय 36) याने पत्नी अनिता (30) हिची हातोड्यासारख्या शस्त्राने निर्घृण हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही गळफास लावून आत्महत्या केली. मंंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने माण तालुका हादरला असून पोलिस तपास करत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, बंडू व अनिता या पती-पत्नीमध्ये वादावादी होत होती. मंगळवारी रात्रीदेखील झालेल्या वादावादीतूनच पती बंडू घुटुकडे याने हातोड्यासारख्या शस्त्राने पत्नीचा खून केला. डोक्यात वर्मी घाव घातल्याने पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर बंडू यानेही ट्रॅक्टरच्या रबरी पट्ट्याने गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती कळताच पोलिस पाटील संतोष खडतरे यांनी म्हसवड पोलिस ठाण्याचे स.पो.नि. अक्षय सोनवणे यांना कळवले. म्हसवड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसे तज्ञ, श्वान पथक, फॉरेन्सिक टीम देखील पोहोचली. प्राथमिक माहितीनुसार पत्नी झोपेत असताना बंडू घुटुकडे याने दगड फोडण्यासाठीचा हातोडा (घन) तीच्या डोक्यात घातला. मृत दाम्पत्याच्या पश्चात 1 मुलगा, 1 मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलांनी टाहो फोडला. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी दहिवडी येथे नेण्यात आले. बुधवारी सायंकाळी मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले.
मध्यरात्रीची घटना सकाळी निदर्शनास...
प्राथमिक माहितीनुसार घुटुकडे दाम्पत्य घराशेजारील गोठ्यामध्ये झोपले होते, तर कुटुुंबातील इतर सदस्य घरी झोपले होते. त्यामुळे या घटनेची माहिती घुटुकडे कुटुंबीयांना सकाळी लक्षात आली.