

सणबूर : तुषार देशमुख
एकेकाळी डोंगरदऱ्यांतून प्रवास विसावा, आधार आणि करणाऱ्या वाटसरूंचा व्यापाऱ्यांचा सर्वसामान्यांच्या प्रवासातील हक्काचा निवारा ठरलेल्या पाटण तालुक्यातील ऐतिहासिक धर्मशाळा आज स्वतःच आधाराच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या वास्तूंनी अनेक पिढ्यांच्या प्रवासाच्या आठवणी जपल्या, ज्या वास्तू तत्कालीन समाजजीवनाच्या गरजेतून उभ्या राहिल्या, त्याच वास्तू आज देखभाली अभावी मोडकळीस येत आहेत.
कुठे भिंर्तीची पडझड, कुठे छताची दुरवस्था, तर कुठे वाढलेली झाडेझुडपे अशा अवस्थेत या ऐतिहासिक वास्तूंचा श्वास कोंडला आहे. शासनाचे दुर्लक्ष, नियमित देखभालीचा अभाव आणि दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची वानवा यामुळे पाटण तालुक्याचा हा ऐतिहासिक ठेवा काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
१९४१ ते १९५२ या कालखंडात डोंगराळ पाटण तालुक्यातील अनेक भागांतून प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्यच होते. पायी चालत किंवा बैलगाडीतून लांबचा प्रवास करणाऱ्या वाटसरूंना रात्रीच्या मुक्कामासाठी सुरक्षित जागा मिळणे कठीण होते व्यापारी, प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेची ही अडचण ओळखून तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डावर कार्यरत असताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी विविध ठिकाणी धर्मशाळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ढेबेवाडी, जानुगडेवाडी, मालदन, कुंभारगाव, कुठरे, मानेगाव, हेळवाक आणि मल्हारपेठ यांसह विविध ठिकाणी उभारलेल्या या धर्मशाळांनी अनेक वर्षे प्रवाशांना आसरा दिला. काळ बदलला, प्रवासाची साधने बदलली आणि धर्मशाळांचा वापरही कमी होत गेला. मात्र, वापर कमी झाला म्हणून एखाद्या ऐतिहासिक वास्तूचेमहत्त्व संपते का? आज हाच प्रश्न या वास्तूंच्या दुरवस्थेकडे पाहताना उपस्थित होत आहे.
जानुगडेवाडी येथील धर्मशाळेने जतनाचा सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. १९४२ च्या सुमारास उभारण्यात आलेली ही वास्तू ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरल्याचे सांगितले जाते. ग्रामस्थ, ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून या इमारतीची देखभाल करण्यात आल्याने ती आजही सुस्थितीत आहे
जानुगडेवाडी येथील धर्मशाळेची लोकसहभागातून जोपासना करण्यात आली असून ती आजही सुस्थितीत आहे. मात्र, इतर ठिकाणच्या धर्मशाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन या वास्तूंची देखभाल करावी. शासनानेही आवश्यक अनुदान उपलब्ध करून दिल्यास हा ऐतिहासिक ठेवा जतन करता येईल.
- अधिक माने, ग्रामस्थ जानुगडेवाडी
एखादी इमारत कोसळल्यानंतर तिच्या पुनर्बाधणीचा विचार करण्यापेक्षा ती कोसळण्यापूर्वी तिचे संवर्धन करणे अधिक गरजेचे आहे. मात्र, या धर्मशाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून पुरेसे अनुदान उपलब्ध होत नसल्याची आणि देखभालीची ठोस व्यवस्था नसल्याची खंत व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने या वास्तूंची सद्यस्थिती तपासून दुरुस्तीचा आराखडा तयार करणे, आवश्यक निधीची तरतूद करणे आणि जबाबदारी निश्चित करणे ही काळाची गरज बनली आहे.