

सातारा : सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर परतीच्या प्रवासात बोगदा परिसरात हृदयविकाराचा धक्का बसल्याने पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक येथील संजय उर्फ तानाजी श्यामराव कदम (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कडवे बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.
कदम हे पुण्यात स्थायिक असून सेवानिवृत्त शास्त्रज्ञ होते. भारत सरकारच्या माध्यमातून ते संशोधनासाठी लंडन येथे गेले होते. ते नियमित धावण्याचा सराव करत होते. रविवारी सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर परतत असताना बोगदा परिसरात त्यांना अचानक त्रास झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, बहिणी व दोन भाऊ असा परिवार आहे.
तातडीने उपचार; मात्र प्रयत्न अपुरे...
मॅरेथॉनदरम्यान कदम यांना अचानक त्रास झाल्यानंतर डॉ. मुजावर, डॉ. कौशिक पाटील व डॉ. प्रतापराव गोळे यांनी तातडीने सीपीआर दिला. त्यानंतर त्यांना प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अँजिओग्राफीमध्ये रक्तवाहिनी ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र, काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.