Satara News: महामार्गाच्या कामावरून अधिकारी फैलावर; स्मार्ट मीटरला सदस्यांचा विरोध

पोस्ट कार्यालयावरूनही अधिकाऱ्यांना जाब
Satara News: महामार्गाच्या कामावरून अधिकारी फैलावर; स्मार्ट मीटरला सदस्यांचा विरोध
Published on
Updated on

सातारा : वेळे ते खिंडवाडीसह जिल्ह्यातील महामार्गाच्या कामावरून एनएचआयच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी चांगलेच फैलावर घेतले. चार दिवसाच्या पावसात महामार्गाच्या कामाची पुरती वाट लागली आहे. अधिकाऱ्यांनी वाहनचालकांच्या जिवाशी खेळू नका, अशा शब्दात सदस्यांनी एनएचआयच्या अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, महावितरणच्या स्मार्ट मीटरला विरोध करत पोस्ट कार्यालयावरुनही अधिकाऱ्यांना सदस्यांनी जाब विचारला.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची सभा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. या सभेस आ. धैर्यशील कदम, जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रीय महामार्गाचा आढावा अधिकारी अनिकेत यादव देत असताना सदस्य प्रविण धस्के यांनी वेळे ते खिंडवाडी दरम्यानच्या महामार्गाच्या कामावरून त्यांना चांगलेच फैलावर घेतले. विजयसिंह नायकवडी यांनी वेळे येथे बोगद्याचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू रस्ता ओलांडताना झाला आहे. वेळे गावात नागरिकांना जायला यायला रस्ता नाही त्यांची तांत्रिक अडचण दूर करा, अशी मागणी केली.

प्रतिक गायकवाड यांनी महामार्गावर काही हॉटेल व्यावसायिकांनी डिव्हायडर तोडल्याने अपघात घडत आहेत. हे डीव्हायडर तोडणाऱ्यांवर कारवाई करा. तसेच टोलनाक्यावर खड्डे पडले आहेत. वाहनांचे टायर फुटतात त्याला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित केला. विनीत पाटील यांनी महामार्गावर रात्रीच्यावेळी वाहनांचे टायर फुटत आहेत. मात्र महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित वाहन वेळेत उपलब्ध होत नसल्याने वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. महामार्गासंदर्भात आ. धैर्यशिल कदम, विक्रमबाबा पाटणकर, महेश गाडे, सौरभ शिंदे, धैर्यशिल भोसले, स्मिता देशमुख, कैलास धुमाळ यांच्यासह अन्य सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. त्यावर अनिकेत यादव यांनी सदस्यांच्या सूचनांवर त्वरित उपाययोजना केल्या जातील असे सांगितले.

महावितरणच्या आढाव्याप्रसंगी सदस्यांनी स्मार्ट मीटर बाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. या चर्चेत प्रविण धस्के, स्मिता देशमुख, विनीत पाटील सहभाग घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news