

सागर गुजर
सातारा : पुणे-बंगळूर महामार्गाची कामे पुणे ते शेंद्रे व शेंद्रे ते कागल या दोन टप्प्यांमध्ये सुरू आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महामार्ग रुंदीकरणाची ही कामे जीवावर उठली आहेत. या कामातील त्रुटी, मंदावलेला वेग, ढासळलेली गुणवत्ता, अनेक ठिकाणचे खड्डे, रखडलेले पूल यामुळे या महामार्गावर जागोजागी साक्षात मृत्यूच टपून बसला आहे. एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे महामार्ग निगराणी पथक मात्र डुलक्या घेत असल्याचे वास्तव आहे. याबाबतचा विषय संसदेतही चर्चिला गेला. मात्र, अनेकदा आश्वासनापलीकडे काहीही पदरात पडत नाही. महामार्गाच्या या अवस्थेवर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका...
महामार्गाचे रुंदीकरण समस्यांचेच विस्तारीकरण करत आहे. याचा प्रत्यय सातत्याने येत असतो. शेंद्रे ते पेठ नाका महामार्गावर जुन्या उड्डाणपुलांच्या रुंदीकरणाची कामे ठिकठिकाणी धोकादायक स्थितीत सुरु आहेत. महामार्ग निगराणी पथकाच्या डुलक्यांमुळे वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणाचा कुणाला पायपोस नसल्याचे चित्र या कामात पहायला मिळत आहे. याठिकाणी भक्कम सुरक्षितता नसल्याने अपघातांत वाढ झाली आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाशेजारी क्षणाक्षणाला मृत्यू घोंगावत आहे.
पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरण कामात शेंद्रे ते कागल हे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या कामात 41 ठिकाणी लहान अंडरपास, मलकापुरात 1 तीन किलोमीटरचा युुनिक उड्डाणपूल तर 1 पादचारी पूल, 53 ठिकाणी बॉक्स कलव्हर्ट, 106 ठिकाणी पाईप कलव्हर्ट, 30 ठिकाणी स्लॅब कलव्हर्ट, 105 ठिकाणी उपमार्ग कलव्हर्ट, वाठार, पाचवड, वारुंजी फाटा, पंढरपूर फाटा हे 4 ग्रेड जंक्शन, 34 विविध ठिकाणी मायनर जंक्शन, 24 ठिकाणी बस स्टॉप, 9 ठिकाणी मोठे अंडरपास, 4 ठिकाणी लहान अंडरपास, 24 ठिकाणी उपमार्ग पूल होणार आहेत. या सर्व ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने कामे सुरु केली आहेत.
मात्र, बहुतांश ठिकाणी सुरक्षिततेबाबत पुरेशी व्यवस्था केलेली नसल्याने महामार्गावर अपघातांत वाढ झाली आहे. बोरगाव, नागठाणे, अतीत, इंदोली, मसूर या ठिकाणी वाहतूक कोंडी सातत्याने होते. तर कराडपासून पेठनाक्यापर्यंत वाहनधारकांना मुंगीच्या वेगाने वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच स्थानिक वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.