

खेड : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांचे ग्रहण काही सुटत नाही. महामार्गावरील खड्डे जीवघेणे बनलेले असतानाच सेवा रस्त्याचीही चाळण झाली आहे. साधारण अर्धा फुटापेक्षा अधिक खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर मरण स्वस्त झाले हो...! असे म्हणण्याची वेळ आली आहे. सेवा रस्ताच खड्ड्यात गेल्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेकांना जीव गमावण्याची वेळ येणार आहे.
महामार्ग व सेवा रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालकांसाठी मुलभूत सुविधांची वानवा, पिण्यासाठी पाणी, शौचालय आदि अनेक मुद्दे वेळोवेळी उपस्थित झाले असून यापूर्वी नागरिकांनी आक्रमक पवित्राही घेतला होता. महामार्गावर सुविधा नाहीतर टोल नाही अशी रास्त भुमिकाही नागरिकांनी घेतली होती. खड्ड्यांबाबत लोकप्रतिनिधींनीही संबंधित प्रशासनाला सुनावले होते. परंतु तात्पुरती मलमपट्टी केल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशीच स्थिती दिसून येत आहे. सध्या पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सेवा रस्त्यावरही मोठे खड्डे असल्याने महामार्गापेक्षा आता सेवा रस्त्यावर अधिक अपघात होणार काय? अशी भिती व्यक्त होत आहे.
वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट सेवा मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मोठी असते. या मार्गावर खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची तीव्रता कळत नाही. त्यामुळे दुचाकी चालकाचा कपाळमोक्ष होत आहे. तर वाहनांचे नुकसान होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. एखादे अवजड वाहन येथील खड्ड्यात अडकून पडण्याची भिती देखील निर्माण झाली आहे.