Satara truck fire : विश्रांतीसाठी थांबलेला ट्रक जळून खाक

शिवडे हद्दीतील पहाटेची घटना, चालक-क्लिनर बचावले; 60 लाखांचे नुकसान
Satara truck fire
विश्रांतीसाठी थांबलेला ट्रक जळून खाक
Published on
Updated on

उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत असलेल्या श्री गणेश ढाब्यासमोर विश्रांतीसाठी उभ्या असलेल्या मालट्रकला अचानक आग लागून ट्रक पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना रविवारी (दि. 1) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या आगीत ट्रकसह त्यातील कापडाचा माल जळून सुमारे 60 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने वेळेवर माहिती मिळाल्याने चालक व क्लिनर प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू येथून मुंबईकडे कापड व रेडिमेड कपड्यांचा माल घेऊन जाणारा मालट्रक पहाटे चारच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गालगत गणेश ढाब्यावर थांबला होता. पहाटेची वेळ असल्याने चालक व क्लिनर केबिनमध्ये झोपले होते. काही वेळातच तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ट्रकला आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दोघांनीही तत्काळ केबिनमधून बाहेर पडत स्वतःचा बचाव केला. ट्रकमध्ये कापडाचा माल असल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले.

आगीची झळ आजूबाजूला उभ्या असलेल्या इतर मालट्रकांना बसली. उंब्रज येथील एका मालट्रकची ताडपत्री जळून गेली, तर अन्य ट्रक तत्काळ हलविण्यात आले. ढाब्यावरील कर्मचारी व वाहनचालकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आग नियंत्रणाबाहेर गेली होती. त्याच कालावधीत घटनास्थळी कराड नगरपालिकेचे व जयवंत शुगरचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत ट्रक व माल पूर्णतः जळून खाक झाला होता. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news