

सातारा : वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने विविध महामार्गांवर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 36 जिल्ह्यांमधील 21 हजार 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील 869 ब्लॅकस्पॉटवर एआयच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. यात जिल्ह्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. एआयच्या पहाऱ्यामुळे अपघात कमी होऊन प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
अतिवेगवान वाहनांवर नजर ठेवून कारवाई करणे, लाल सिग्नल ओलांडणाऱ्या वाहनावर व्हिडीओ पुराव्यासह दंड आकारणे, अपघातानंतर संबंधित यंत्रणांना माहिती देऊन प्रतिसाद देणे ही व्यवस्था एआय आधारित आयटीएमएसमध्ये असणार आहे. महामार्गावर मार्गिकांची शिस्त मोडणाऱ्या वाहनांसह तब्बल 17 प्रकारच्या वाहतूक नियमभंगाची तात्काळ नोंद होणार आहे. नियम मोडताच वाहनमालकाच्या मोबाईलवर ई-चलनचा मेसेज पाठवला जाणार असून, त्यानुसार दंडाची वसुली केली जाणार आहे. या प्रणाली अंतर्गत आता प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर कॅमेरे लावण्याची तयारी युध्दपातळीवर सुरु आहे.
या योजनेत सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गासह रत्नागिरी-नागपूर महामार्गाचाही समावेश असून, महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. एआय आधारित आयटीएमएस प्रणालीमुळे वेगमर्यादा ओलांडणे, लेन तोडणे, उलट्या दिशेने वाहन चालवणे, सीटबेल्ट न वापरणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, रस्ते अपघातास कारणीभूत आहेत.