Satara Rain: जिल्ह्यात मुसळधार; जनजीवन विस्कळीत

झाडे उन्मळली, दरडी कोसळल्या : नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Satara Rain
Satara Rain
Published on
Updated on

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रविवारी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कृष्णा, वेण्णा, उरमोडी, तारळी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णा नदीवरील मर्ढे येथील पूल पाण्याखाली गेला. रविवारी परळी खोऱ्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर सज्जनगड मार्गावर दरड कोसळली. महाबळेश्वरमधील वेण्णालेक ओव्हरफ्लो झाला असून, भिलार परिसरात संरक्षण भित कोसळली. वाईतील फुलेनगर परिसरातील ओढ्यावर उभारण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

रविवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सातारकरांसाठी रविवार पावसाचा दिवस ठरला. ढगाळ वातावरण, जोरदार वारे त्यामुळे गारवा वाढला होता. तसेच थंडीही जाणवत होती. रविवार बाजाराचा दिवस असल्याने शहर व परिसरातील भाजी मंडईत राडारोडा झाला होता. पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. जोरदार पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत होते. बॉम्बे रेस्टाॅरंट परिसरासह अन्य सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली होती.

जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. परळी खोऱ्यात सातारा, ठोसेघर, चाळकेवाडी मार्गावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच सज्जनगमार्गावर दरड कोसळली. भिलार, ता. महाबळेश्वर परिसरात एका हॉटेलची संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

कोयना, कण्हेर, धोम बलकवडी, धोम, उरमोडी, तारळी, वीर, भाटघर, येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग मराठवाडी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलाव, महाबळेश्वर व पाचगणीला पाणीपुरवठा करणाऱ्या वेण्णा तलावातील पाणी पातळीत वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने महाबळेश्वर व पाचगणीचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. ठोसेघर ल. पा. तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून प्रवाह सुरू झाला आहे.

दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी कास, ठोसेघर, येवतेश्वर, सज्जनगड, बामनोली, पाचगणी-महाबळेश्वर परिसरात गर्दी केली होती. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मर्ढे येथील कृष्णा नदी पूल पाण्याखाली गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news