

सातारा/महाबळेश्वर : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. महाबळेश्वरमध्ये वेण्णालेकजवळील पूल कोसळला असून त्यामध्ये चार वाहने वाहून गेली. आंबेघर पुलाचा भराव खचल्यामुळे मेढा - महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. परळी खोऱ्यात शाळांच्या इमारतींना तडे गेले. विजेचे खांब पडले असून, विहीर खचण्याचे प्रकारही घडले. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या, पत्रे उडाले. परळी खोऱ्यात शाळांच्या इमारतींना तडे गेले, विजेचे खांब पडले. दरम्यान, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली असून, कोयना धरण साठा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून, प्रचंड नुकसानीमुळे जनजीवन पूर्णत: कोलमडले आहे. महाबळेश्वरच्या वेण्णालेकजवळ मुख्य रस्त्याला जोडणारा छोटा पूल पुराच्या पाण्यात कोसळला. त्यामुळे लगतची चार वाहने वाहून गेली. ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली. मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात काळा खडक येथे दरड कोसळली. त्यामुळे रस्त्यावर राडा रोडा पसरला. हा रस्ताही वाहतुकीस काही काळ बंद ठेवण्यात आला.
मिरजे (ता. खंडाळा) येथील प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत बाजूला असणाऱ्या महादेव सोनावणे यांच्या गोठ्यावर पडली. त्यामुळे तेथील शेळी व करडू मरण पावले. भादे (ता. खंडाळा) येथील बाळासाहेब साळुंखे यांच्या घराचीही भिंत कोसळली. कारी (ता. सातारा) येथील जि. प. शाळेचा पत्रा पावसामुळे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात शाळेचे नुकसान झालेे. मोरेवाडी गावात पाणी शिरले तसेच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. कुस खुर्द व पांगारे येथे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खडगाव येथेही घरांचे पत्रे उडाले. नद्यांची पाणी पातळी वाढू लागली असून, वाईत कृष्णेचा प्रवाह वाढला. बहुतांश धरणांच्या साठ्यातही वाढ होत आहे.
महाबळेश्वरमध्ये उच्चांकी २०.१९ इंच पाऊस
महाबळेश्वर व परिसरात गेल्या २४ तासांत उच्चांकी ५१३.०० मि.मी. म्हणजेच तब्बल २०.१९ इंच पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण १ हजार ७१७.४० मि.मी. (६७.६१ इंच) पाऊस झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सोमवारी सरासरी ५२.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. सातारा ३९.२ मि.मी., जावली १५३.५ मि.मी., पाटण ४७.२ मि.मी., कराड २५.७ मि.मी., कोरेगाव ४७.१ मि.मी., खटाव १९.४ मि.मी., माण ५ मि.मी., फलटण १८.८ मि.मी., खंडाळा ६२. ४ मि.मी., वाई ८८.४ मि.मी., महाबळेश्वर २८६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.