

सातारा : जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर मनुष्यबळाची कमतरता आणि रुग्णसेवेचा वाढता ताण असतानाच गेल्या वर्षभरात अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवायांनी प्रशासकीय यंत्रणेची चिंता वाढवली आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चांदसाब शिकलगार आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने अशा चार वर्ग-एक अधिकाऱ्यांवर विविध कारणांनी निलंबनाची कारवाई झाली.
याशिवाय लाचखोरी तसेच मृतदेह अदलाबदलीच्या प्रकरणांत चार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली. त्यामुळे वर्षभरात एकूण आठ अधिकारी-कर्मचारी निलंबित झाल्याने जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई आवश्यक असली, तरी एकाच वर्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची वेळ येणे ही बाब गंभीर मानली जात आहे. विशेषतः जिल्ह्यात आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असून, उपलब्ध मनुष्यबळावरच रुग्णसेवेचा गाडा हाकला जात आहे. अशा परिस्थितीत अधिकारी - कर्मचाऱ्यांवरील कारवाईमुळे प्रशासकीय कामकाजाचा भार उर्वरित कर्मचाऱ्यांवर पडण्याची शक्यता आहे.
'कारवाई'नंतरही मूळ प्रश्न कायम...
गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, वारंवार असे प्रकार घडत असतील तर त्यामागील प्रशासकीय कारणे आणि अंतर्गत नियंत्रण यंत्रणेतील त्रुटी शोधण्याची गरज आहे. मेडिकल बिलांपासून मृतदेह व्यवस्थापनापर्यंतच्या बाबींमध्ये गैरप्रकार अथवा गंभीर चुका समोर येत असतील, तर केवळ निलंबनाची कारवाई करून प्रश्न संपणार नाही. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत आधीच मनुष्यबळाचा तुटवडा आहे. त्यातच वर्षभरात चार वर्ग-एक अधिकाऱ्यांसह आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
मृतदेह अदलाबदल; दोन कर्मचारी निलंबित...
एप्रिल महिन्यात मृतदेहाची दोन वेळा अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकरणी शंकर शिंदे आणि विशाल रावखंडे यांना निलंबित करण्यात आले. रुग्णालयीन व्यवस्थेतील अत्यंत संवेदनशील असलेल्या मृतदेह हाताळणीमध्येच अशी गंभीर त्रुटी घडल्याने संबंधित यंत्रणेतील दक्षता आणि जबाबदारी निश्चितीचा मुद्दा ऐरणीवर आला.
चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई...
दरम्यान, वरिष्ठ पातळीवरील चार वर्ग-एक अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई झाली आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चांदसाब शिकलगार आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर विविध कारणांवरून कारवाई करण्यात आली.