Satara Monsoon tourism: डोंगरदऱ्या हिरवळल्या; धबधबे फेसाळले

निसर्गप्रेमी व पर्यटकांना खुणावतो एकीव-दुंद
Satara Monsoon tourism: डोंगरदऱ्या हिरवळल्या; धबधबे फेसाळले
Published on
Updated on

मेढा : जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे जावली तालुक्यातील डोंगरदऱ्या हिरव्या शालूने नटल्या असून प्रसिद्ध एकीव (पाबळ) धबधबा दिमाखात प्रवाहित झाला आहे. उन्हाळ्यानंतर प्रथमच धबधबा फेसाळत कोसळू लागल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शनिवार-रविवारी येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जावलीच्या दक्षिण विभागातील कुसुंबीमार्गे एकीव गावाजवळील पाबळ धबधबा हा सातारा जिल्ह्यातील निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा धबधबा पुन्हा प्रवाहित झाला आहे. धबधब्याचे विहंगम दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. याचबरोबर दुंद घाटातील रस्त्यालगतचा धबधबाही प्रवाहित झाला असून पर्यटक फोटोसेशन, सेल्फी आणि निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. तालुक्यातील अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे सुरू झाल्याने संपूर्ण परिसराला पावसाळी पर्यटनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सततच्या पावसामुळे डोंगररांगा हिरव्यागार झाल्या असून वातावरणात सुखद गारवा पसरला आहे. पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले असून सृष्टी नवचैतन्याने बहरली आहे. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही दिलासा मिळाला असून परिसरातील नैसर्गिक जलस्रोत पुन्हा तुडुंब भरू लागले आहेत.

तालुक्यातील डोंगर परिसर हिरवळल्याने निसर्गप्रेमी आकर्षित झाले आहेत. दरम्यान, पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता धबधब्याजवळ सेल्फी किंवा धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळून सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news