

सातारा : सातार्याजवळील म्हसवे गावाच्या हद्दीत रविवारी पहाटे जेजुरीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये आरळे (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथील आजोबा-नातीचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. या अपघात प्रकरणी ट्रॅव्हलर व ट्रक चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
एकनाथ बापू कांबळे (वय ७५) व स्नेहल उत्तम कांबळे (१६) मृत आजोबा व नातीचे नाव आहे. दीपक नामदेव कांबळे (३४), मधुकर बापू कांबळे ( ०), अमित मधुकर कांबळे (३३), उत्तम एकनाथ कांबळे व आशा मधुकर कांबळे (५०, सर्व रा. कसबा आरळे) यांच्यासह इतर किरकोळ सहाजण जखमी झाले. या अपघातप्रकरणी उत्तम एकनाथ कांबळे (वय ४२) यांनी बालाजी लक्ष्मण घाटे (२५, रा. वडकी ता. हवेली, जि. पुणे) व संदीप एकनाथ पाटील (४०, रा. मांढरे, पो. सावर्डे, ता. करवीर) या दोन चालकांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अपघाताची घटना रविवारी पहाटे साडेचार वाचण्याच्या सुमारास म्हसवे गावाच्या हद्दीत घडली. महामार्गावर एमएच १६ डीटी ६०६० या क्रमांकाचा ट्रक थांबला होता. ट्रक चालकाने ट्रक वाहतुकीस अडथळा होईल व लाेकांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने पार्किंग लाईट न लावता उभा केला होता. याचवेळी मागून येणार्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरची जोराची धडक बसली. यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. वाहनांचे नुकसान होऊन ट्रॅव्हरलमधील भाविकांनी मदतीसाठी आक्रोश केला. क्षणात परिसरात रक्ताचा व काचांचा सडा पडला.
जखमींना ट्रॅव्हलरमधून बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल केले; मात्र अपघातात आजोबा व नातीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. जखमी भाविक कमालीचे घाबरले होते. सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन बाजूला घेण्यात आले. जखमींनी अपघाताची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर कोल्हापूरहून कुटुंबीय, नातेवाईक सातार्यात पोहोचले.