

सातारा : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, ही भावना मनाशी बाळगत रूग्णालयीन कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडताना दिसतात. मात्र जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आजही परिचारिकांची बहुसंख्य पदे रिक्त असून ती वेळच्यावेळी भरली जात नसल्याने अन्य परिचारिकांवर कामाचा ताण येतो. जनरल वॉर्डमध्ये तीन रूग्णांच्या मागे एक परिचारिका असा रेषो नर्सिग परिषदेने ठरवला आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सेवा देताना परिचारिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
आज 12 मे आतंरराष्ट्रीय परिचारिका दिन. परिचारिका म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती पांढऱ्या शुभ्र कपड्यात रूग्णांची अहोरात्र सेवा करणारी, त्यांना धीर देणारी, रूग्णांच्या कुटुंबाना आधार देणारी स्त्री , स्वत:च्या कुटुंबाकडे प्रसंगी दुर्लक्ष करून रूग्णसेवा करणाऱ्या परिचारिका शासकीय व खासगी रूग्णालयात दिसून येतात. त्यांचा गौरव करणारा हा दिवस आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय 18, प्राथमिक आरोग्य केंद्र 84, आरोग्य उपकेंद्रे 418, जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखाने 17, प्राथमिक आरोग्य पथके 6, नागरी आरोग्य केंद्रे 4 अशा शासकीय आरोग्य संस्था शहरी व ग्रामीण भागात कार्यरत आहेत. या संस्थामार्फत ग्रामीण दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागात दर 3 हजार लोकसंख्येच्या मागे एक उपकेंद्र तर 20 हजार लोकसंख्येच्या मागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे. पण लोकसंख्येची वाढ बघता अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सेवा देताना परिचारिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
दरवर्षी शासन आरोग्यांशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवनवे विभाग सुरु करण्यात येत आहेत. कर्मचारी संख्या अपुरी व पुरेशी नसल्याने तिथे काम करणाऱ्या परिचारिकांवर कामांचा ताणही वाढत चालला आहे. शासकीय आरोग्य संस्थामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णांकडे वैयक्तीक लक्ष देवून त्यांची सुश्रुषा करण्याचा परिचारिकांचा प्रयत्न असतो. कुटुंबातील कोणीच सदस्य रुग्णांजवळ नसतो तेव्हा परिचारिकाच रुग्णांना मायेची फूंकर घालून आधार देत असतात.