Satara Crime : गोळेश्वरात मुलाचा खून

आई-वडील, भाऊ अटकेत सोनसळ घाटात मृतदेह फेकला; तिघांना पोलिस कोठडी
Murder
Murder
Published on: 
Updated on: 

कराड : गोळेश्वर (ता. कराड) येथे कौटुंबिक वादातून डोक्यात स्टूल घातल्याने धनाजी सत्यवान अदलिंगे याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सोनसळ घाटात फेकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी मृताची आई सुरेखा सत्यवान अदलिंगे, वडील सत्यवान तुकाराम अदलिंगे आणि भाऊ लक्ष्मण सत्यवान अदलिंगे या तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोनसळ घाटात चार दिवसांपूर्वी ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या परिस्थितीवरून पोलिसांना मृत्यूबाबत संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिस अंमलदार संदीप पाटील आणि अमित पवार यांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह गोळेश्वर येथील धनाजी अदलिंगे याचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांकडे तपास केंद्रित केला.

तपासादरम्यान धनाजी याचा आठवडाभरापूर्वी घरात कौटुंबिक कारणावरून आई, वडील आणि भावासोबत वाद झाल्याची माहिती समोर आली. घरातील सदस्यांना धनाजी याच्याकडून त्रास होत असल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. त्यावेळी धनाजी याच्या डोक्यात स्टूल घालण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो सोनसळ घाटात नेऊन टाकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सुरुवातीला या प्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासात खुनाचा संशय बळावल्याने पोलिसांनी पुढील कारवाई करत सत्यवान तुकाराम अदलिंगे, सुरेखा सत्यवान अदलिंगे आणि लक्ष्मण सत्यवान अदलिंगे यांना गुरुवारी सायंकाळी अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कराड ग्रामीण पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news