

सातारा : गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या वातावरणामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. मुले शाळा, मैदानावर एकमेकांच्या सहवासात येतात. त्यामुळे संसर्गजन्य आजार होत असल्याचे चित्र आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून थोडा ताप आला तरी रुग्णालयांकडे धाव घेतली जात आहे.
पावसाळा सुरु झाला की संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. मागील काही आठवड्यांपासून शहरात पावसाळी वातावरण आहे. या दिवसांमध्ये डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डेंग्यु, मलेरियासारखे आजार तसेच संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्या लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांकडे गर्दी होत आहे. सतत ताप येणे, अंगावर पुरळ, छातीत कफ भरणे ही लक्षणे मुलांमध्ये आढळून येत आहेत. दीड ते दोन वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये संसर्गजन्य ताप व सर्दी-खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. मुलांचा ताप कमी होत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सध्या शहरात सर्दी, खोकला, ताप, जुलाब आणि अतिसार अशा समस्यांनी मुले त्रस्त झाली आहेत. शहरातील विविध दवाखान्यांमध्ये सुमारे 10 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पालकांकडून त्यांच्या मुलांना तपासणीसाठी दवाखान्यात नेले जात आहे. यामुळे दवाखान्यांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. पावसाळ्यात सर्दी, ताप याबरोबरच डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार डासांमुळे होतात. आपल्या परिसरात पाणी साचून देऊ नका, तसेच डास प्रतिबंधकचा वापर करावा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.