

सातारा : सातारा शहरानजीक खिंडवाडी येथे खाणीनजीक कंटेनरमध्ये जिलेटिनच्या कांड्या व अमोनियम नायट्रेटचा साठा सापडला असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. जिलेटिनसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची रात्री उशिरापर्यंत मोजदाद सुरू होती.
सातारा शहर व सातारा तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. गुरुवारी दुपारी जिलेटिनसाठ्याबाबत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना माहिती मिळाली. त्यानुसार डीवायएसपी राजीव नवले, पोनि सचिन म्हेत्रे, पोनि नीलेश तांबे यांनी गंभीर दखल घेत पोलिसांचे पथक तयार केले. जिलेटिनसाठ्याची माहिती घेऊन खिंडवाडी येथे तत्काळ पोलिस पथक दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे कंटेनरचा फक्त मोठा बॉक्स उभा केला होता. पोलिसांनी कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या मोठ्या प्रमाणात होत्या. पोलिसांनी खरबदारी घेत परिसर सील केला. तत्काळ बीडीडीएस, फॉरेन्सिक पथक पाचारण केले. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ४०० किलो वजनापेक्षा अधिक जिलेटिन व अमोनियम नायट्रेटचा साठा आहे.
साठा कोणाचा अन् कोठून आणले जिलेटिन?
जिलेटिन हा धोकादायक स्फोटक पदार्थ आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी जिलेटिन स्फोटांचे गंभीर परिणाम भोगलेले आहेत. जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानी यापूर्वी झाली आहे. अशा परिस्थितीत सातारा शहरालगतच कंटेनरमध्येच जिलेटिनचा साठा सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. साठा नेमका कोणी केला? जिलेटिन साठ्याला परवानगी आहे का? जिलेटिन कशासाठी वापरले जाणार होते? जिलेटिन कुठून आणले गेले?