

कराड : गॅस सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर कराडमधील पाच गॅस एजन्सींवर पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचे वितरण करण्यात आले. गॅस वितरण प्रसंगी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. दरम्यान, कराड तालुक्यातील हॉटेल आणि धाब्यांमध्ये गॅस सिलेंडरचा साठा केला जात नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी पुरवठा विभागाने अचानक तपासणी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान अनेक हॉटेल व धाब्यावर व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने चुली पेटवून त्यावर जेवण बनविले जात असल्याने निदर्शनास आले.
कराडचे पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे यांनी पथकासह रात्री अचानक धाड टाकत अनेक हॉटेल व धाब्यांची पाहणी केली. सिलेंडरचा अवैध साठा किंवा गैरवापर होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील हॉटेल व धाबे व्यवसायाला बसत आहे. अनेक ठिकाणी व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल चालकांनी पुन्हा चुलीचा आधार घेतला आहे. अस्सल चुलीवरचे झणझणीत मटण-भाकरी तसेच शाकाहारी जेवण तयार करून ग्राहकांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
गॅसअभावी स्वयंपाकासाठी लाकूड व कोळसा यांची खरेदी वाढली असून, अनेक धाबेचालकांनी स्वयंपाकघराच्या बाहेर लाकडांचा साठा केल्याचे चित्र दिसत आहे. कपिल, शेरे, गोटे, मुंडे, सुपने, मल्हारपेठ, उंडाळे, कोयना वसाहत, मलकापूर, सैदापूर, गोवारे, टेंभू, खोडशी, वनवासनाची आणि काळगाव आदी गावांमध्ये संबंधित एजन्सीच्या वाहनांद्वारे गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. वितरण करताना पुरवठा विभागाचे पथक सक्रिय होते. या पथकात पुरवठा अधिकारी साहिल नायकवडे, पुरवठा निरीक्षक राहुल शिंदे तसेच पुरवठा लिपिक पूनम पाटील आणि वैष्णवी लोखंडे यांचा समावेश होता. पथकाने कार्यवाही करत गॅस वितरण प्रक्रियेवर नजर ठेवली आहे. गोडाऊनची तपासणी केली जात आहे.