Satara gas distribution: साताऱ्यात आजपासून होमगार्ड संरक्षणात गॅस वितरण
सातारा : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्यातील गॅस एजन्सीजसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही ठिकाणी नागरिक आणि गॅस वितरण कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रविवारपासून गॅस सिलिंडर वितरणासाठी होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात सपोनि अविनाश माने यांच्या उपस्थितीत शहरातील गॅस वितरकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस चंद्रकांत मावशे, हेमंत जाजू, अभय बाजारे-साळुंखे, सस्मित वाघोलीकर, यशराज भोसले, चंद्रकांत पाटील, युवराज माने यांच्यासह वितरक उपस्थित होते. या बैठकीत वितरकांनी नागरिकांची वाढती गर्दी, निर्माण होणारे तणावाचे प्रसंग आणि वितरणावेळी येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरता होमगार्ड बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले. परिस्थिती गंभीर झाल्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असेही माने यांनी सांगितले.
गेल्या चार दिवसांपासून सातारा शहरासह जिल्ह्यात गॅस टंचाईची चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी संभाव्य टंचाईच्या भीतीने नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीकडे धाव घेत आहेत. परिणामी, अनेक गॅस वितरण केंद्रांपुढे शेकडो नागरिकांच्या रांगा लागत असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीही होत आहे. दरम्यान, गॅस एजन्सीसमोर सकाळपासून नागरिकांची गर्दी होत असल्याने वितरण कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी एजन्सी मालक आणि नागरिकांमध्येही शाब्दिक चकमक झाली. मात्र उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले आणि वितरण प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.

