Satara Crime: फलटणमधील १० जणांची टोळी तडीपार; युवतीचाही समावेश

पोलिस अधीक्षकांचा दणका
Satara Crime: फलटणमधील १० जणांची टोळी तडीपार; युवतीचाही समावेश
Published on
Updated on

सातारा : फलटण शहर परिसरात शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या १० जणांच्या टोळीला तडीपार करत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दणका दिला. संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्‍यान, तडीपारीमध्ये सातारा तालुक्‍यातील युवतीचाही सहभाग आहे.

तुषार ऊर्फ गद्या संजय ननवरे (वय २४, रा. मंगळवारपेठ, फलटण), साहिल रवी तारे (वय २४, रा. दत्तनगर फलटण), वैभव बाळासो सस्ते (वय २५, रा. सस्तेवाडी फलटण), रोहन ऊर्फ यल्या नवीन काकडे (वय २४, रा. मंगळवार पेठ, फलटण), विनायक बाळासो जाधव (वय २०, रा. ठाकुरकी, फलटण), राज ऊर्फ राजू राम बोके (वय ३८, रा. मंगळवार पेठ, फलटण), विजय दत्तु ननवरे (वय २७, रा. मंगळवार पेठ, फलटण), सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे (वय ३१, रा. विर, ता. पुरंदर जि. पुणे), राहुल रामचंद्र जगताप (वय २६, रा. कसबापेठ, फलटण) अशी नावे आहेत.

यामध्ये सातारा तालुक्‍यातील एका युवतीचाही सहभाग आहे. संशयित टोळीवर चोरी करणे, जबरी चोरीसह खंडणी मागणे, दुखापत पोहचवणे, बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्‍हे दाखल झाल्‍यानंतर संशयितांना वेळोवेळी अटक केली होती. तसेच प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र त्यांनी गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्या. या टोळीवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर कायद्याचा वचक रहावा यासाठी सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.

दस का दम...

‘दस का दम’ अशा या टोळीने उच्छाद मांडला होता. प्रभावी व कठोर कारवाईची मागणी होत होती. फलटण शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी पोनि अरविंद काळे यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे प्रस्‍ताव तयार केला. पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधीकरणचे निखिल पिंगळे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्‍यानुसार तीन जिल्‍ह्यतून ६ महिन्‍यांसाठी संशयितांना तडीपार करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, एलसीबीचे पोनि विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपारीसंबंधी योग्य पुरावा सादर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news