Satara crime: व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

म्हसवड पोलिसांची कारवाई; तिघांना अटक : साडेबावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Satara crime
Satara crime: व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाशPudhari
Published on
Updated on

देवापूर : शेतीसाठी आवश्यक असलेल्या ठिबक सिंचन पाईप्सचा व्यापार करणाऱ्या पुणे तसेच मध्य प्रदेश येथील व्यापाऱ्यांना मालाच्या ऑर्डरच्या बहाण्याने म्हसवड येथे बोलावून मारहाण करून लुटणाऱ्या सराईत टोळीचा म्हसवड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 22 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

जनार्दन विलास लोखंडे, किरण अभिमान ऊर्फ अभिमन्यू पवार (दोघे रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व विजय गोरख शिंदे (रा. निमगाव टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर. के. ड्रिप अँड मल्चिंग प्रोडक्शन, पुणे या कंपनीकडून ठिबक सिंचन पाईप्सच्या मालाची अज्ञात व्यक्तीने ऑर्डर दिली होती व हा माल म्हसवड येथे आणण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार शशिकांत नानाभाऊ वाघ (रा. रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे नारायणगाव (पुणे) येथून अशोक लेलँड कंपनीच्या वाहनातून ठिबक सिंचन पाईप्स घेऊन म्हसवड येथे आले. म्हसवड-माळशिरस रोडवरील भाटकी गावाच्या माळरानाजवळ पोहोचताच बुलेट मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले.

त्यानंतर तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्याला वाहनातून जबरदस्तीने खाली ओढून मारहाण केली व जीवे मारण्याच्या धमक्या देत वाहनातील सर्व मुद्देमाल उतरवून घेतला. संशयितांनी पिकअप वाहन बोलावून त्यामध्ये सर्व माल भरून घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात जबरी चोरी (दरोडा) चा गुन्हा दाखल झाला होता. घटनेची तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सपोनि अक्षय सोनवणे यांनी तपास पथक रवाना केले. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अवघ्या 12 तासांत अत्यंत गतिमान कारवाई करत सपोनि सोनवणे व त्यांच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातून तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली वाहने व चोरलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध जिल्ह्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक तपासात गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्यालाही अशाच पद्धतीने मारहाण करून लुटल्याची माहिती पुढे आली आहे. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलाणी, धीरज कवडे, अभिजित भादुले यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news