Satara Traffic News: गणेशभक्तांच्या गर्दीने महामार्ग ब्लॉक

खंडाळा, आनेवाडी टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा; कोंडीमुळे वाहनचालक, प्रवासी त्रस्त
Satara Traffic
Satara Traffic
Published on
Updated on

खंडाळा/लिंब : लाडक्या बाप्पांचे आगमन सोमवारी होत असल्यामुळे शनिवारी महामार्गावर प्रचंड ताण आला. गणेशभक्त व चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे निघाल्याने महामार्गावर पारगाव-खंडाळा व आनेवाडी टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी झाली. ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यातून मार्ग काढताना वाहनचालक व प्रवाशांच्या नाकी नऊ आले. अनेकदा वादावादीचेही प्रकार घडले. रात्री उशिरापर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी हे चित्र कायम होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटकसह कोकणस्थ गणेश भक्त पुणे-मुंबईकर गणेश उत्सव साजरा करण्यासाठी घराकडे परतू लागल्याने या भक्तांच्या अलोट गर्दीने महामार्गावर वाहनांचा ओघ वाढला. मात्र, पारगाव-खंडाळा उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग अरुंद झाल्याने वाढलेल्या वाहनांचा भार या मार्गाला पेलता आला नाही. परिणामी, काही वेळातच वाहतूक ठप्प झाली.

केसुर्डी फाटा ते पारगाव-खंडाळा जुना टोल नाका हे अवघे सुमारे तीन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. वाहनांच्या रांगा लागल्याने चालकांना पुढे जाण्यासाठी जागा मिळत नव्हती. दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनेही अडकून पडली होती. पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरून वाहनांना मार्ग करून देताना लांची दमछाक झाली होती.

आनेवाडीत पाच किलोमीटरची रांग

आनेवाडी टोल नाक्यावर सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. फास्टॅ‍ग असला तरीही नाक्यावर शनिवारी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते. अनेक गणेशभक्तांनी गणेशोत्सवासाठी जाताना टोल पास आणल्याने या पासवर वाहने नाका प्रशासनाकडून सोडून दिली जात होती. नाक्यावर एकीकडे पुणे - मुंबईकडून येणाऱ्या लेनवर पाच किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या तर याच्या उलट चित्र पुणे बाजूस जाणाऱ्या लेनवर तुरळक वाहने नाक्यावर दिसत होती.

दुपारनंतर कोंडीचा कडेलोट

दुपारी १२ वाजल्यानंतर वाहनांच्या संख्येत आणखी भर पडल्याने स्थिती अधिकच बिकट झाली. महामार्ग पोलिस तसेच खंडाळा व शिरवळ पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर नवीन उड्डाणपुलावरून नवीन बोगद्याच्या दिशेने एक लेन वाहतुकीसाठी सुरू झाली. त्यामुळे कोंडीचा काही प्रमाणात ताण कमी झाला.

लहान मुले, वृद्धांचा जीव टांगणीला

गणपतीच्या सुट्टीसाठी गावी निघालेल्या अनेक कुटुंबांना या कोंडीचा फटका बसला. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना तासन्‌ तास वाहनांमध्ये बसून राहावे लागले. उन्हाची तीव्रता आणि कोंडीमुळे प्रवाशांचे ­­­हाल झाले. काही लहान मुलांना उलट्या व उष्णतेचा त्रास जाणवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news