

सातारा : दहीहंडीसाठी संबाटा या रॅपरला बोलावल्यानंतर गांधी मैदानावर झालेल्या गोंधळ आयोजकासह, डीजेला नडला असून पोलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल झाला.
यश सावंत, मयूर जाधव, सौरभ ऊर्फ कुक्या खरात, धीरज शेळके, संग्राम दणाणे, तुषार धोत्रे, अनिकेत पवार (सर्व रा. सातारा), डीजे चालक उदय गोविंद बर्गे (रा. चिंचणेर) व अनोळखी १० ते १२ जण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिस दीपक पोळ यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
७ सप्टेंबर रोजी याबाबत पोलिसांनी आयोजकांना विविध सूचना देऊन त्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले होते. मात्र प्रत्यक्ष दहीहंडी कार्यक्रमाचा बोर्या उडाला. पोलिसांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, डीजे लावून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला. रस्त्यावर स्टेज टाकून पादचारी तसेच वाहन चालकांना अटकाव केला. याबाबतचे आदेश सातारा पोलिस दलाने लागू केले आहेत. आयोजक व युवकांनी एकमेकांना मारहाण करत दोन गटात वाद निर्माण केला. अशा प्रकारे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दै. ‘पुढारी’ने केलेली पोलखोल..
दहिहंडी कार्यक्रमात कमालीची हुल्लडबाजी होऊन चेंगराचेंगरी झाली हाेती. स्टेज व कारवर युवक उभे राहून आरडाओरडा करत हाेते. अशातच थेट हाणामारीची घटना घडली होती. सुदैवाने अधिक चेंगराचेंगरी झाली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. याबाबतचे सविस्तर वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध करत पोलखोल केली होती.