

लिंब : लिंब (ता. सातारा) येथे शोषखड्ड्यात पडल्यामुळे चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. हर्ष स्वप्निल लोंढे (वय ४, मूळ गाव बेलावडे, ता. जावली) असे या चिमुरड्याचे नाव आहे.
लिंब येथील बिडीवाल्याचा मळा येथे हर्षचे आजोळ आहे. गेल्या दहा दिवसांपासून तो आजोळी आला होता. शुक्रवारी हर्ष आपल्या आजीबरोबर शेतात फिरण्यास गेला होता. परत घरी येत असताना हर्ष शेतातील रस्त्यावर पाय घसरून बाजूच्या शोषखड्ड्यात पडला.
हा खड्डा तब्बल दहा ते बारा फुटांचा असल्याने त्याचा पाणी आणि चिखलाच्या राड्यात घुटमळून मृत्यू झाला. हर्ष आपल्या आर्मीत कार्यरत असलेल्या वडिलांसोबत शुक्रवारी पुण्याला जाणार होता; पण त्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार आशिष कुमठेकर करत आहेत.