

देवापूर : राजकीय झगमगाट, मोठ-मोठे बंगले आणि आलिशान व्यवस्थेपासून दूर जात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी माण तालुक्यातील पांगरी येथे मेंढपाळांच्या वाड्यावर मुक्काम करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मेंढपाळांच्या जीवनातील वास्तव जवळून अनुभवत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
रासपचे माण तालुका युवक अध्यक्ष तात्याराम दडस यांच्या शेतातील मेंढरांच्या वाड्यावर जानकर पोहोचले. कोणताही राजकीय बडेजाव न करता त्यांनी थेट माळरानावर मेंढपाळांसोबत वेळ घालवला. ऊन, वारा आणि पावसाशी झुंज देत जगणाऱ्या या समाजाच्या अडचणी त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी मेंढपाळांसोबत साधे जेवण केले आणि रात्रीचा मुक्कामही त्याच वाड्यावर केला. जमिनीवर झोपून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना महादेव जानकर भावूक झाले. ते म्हणाले, आज या माळरानावर मेंढपाळांसोबत मुक्काम करताना मला 50 वर्षांपूर्वीचे माझे बालपण आठवले. संघर्ष, कष्ट आणि अभाव यामध्येच आम्ही आयुष्य जगलो. त्यामुळे मेंढपाळांच्या वेदना मला जवळून समजतात. त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी काम करण्याची प्रेरणा आजही कायम आहे.