सातारा : लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर फूलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सातारा शहर व परिसरात ठिकठिकाणी केशरी, पिवळ्या गोंड्यांची रास दिसत होती. लक्ष्मीपूजनासाठी पांढऱ्या शेवंतीला विशेष मागणी वाढली होती; तर आवक वाढल्याने दरात फटका बसल्याने उत्पादक काहीसे हिरमुसले.
दरवर्षीच सण-उत्सवांमध्ये इतर फुलांबरोबर झेंडूच्या फुलांची मागणी वाढते. लक्ष्मीपूजन व वही पूजनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारीदेखील फुलांना मागणी वाढली होती. लक्ष्मी पूजनासाठी झेंडूच्या फुलांबरोबरच पांढऱ्या शेवंतीला विशेष स्थान आहे. पूजेसह वाहन, वस्तूंच्या पूजनाशिवाय इतर व्यावसायिक गोडावून तसेच घराच्या दारांसाठी झेंडूच्या फुलांचा व हारांचा वापर होतो. त्यामुळे सणामध्ये झेंडूला मागणी असते. या पार्श्वभूमीवर सातारा शहर व परिसरात झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. सातारा शहरातील फूलबाजारात स्थानिक शेतकऱ्यांसह बाहेरूनही झेंडूची आवक झाली आहे. त्यामुळे सातारा शहर परिसरात केशरी-पिवळ्या गोंड्यांची रास वाढे फाटा, जरंडेश्वर नाका, पोवईनाका, बॉम्बे रेस्टॉरंट, झेडपी चौक, राजवाडा परिसर, भाजी मंडई परिसरात पहावयास मिळाली.