Satara News | वेण्णा, उरमोडी, नीरा नद्यांना पूर

धरणांच्या पाणी पातळीत वाढ; पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला
Satara News |
संततधार पाऊस व कण्हेर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे, तर दुसर्‍या छायाचित्रात पुरामुळे किडगाव पूल पाण्याखाली गेला. Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कण्हेर, उरमोडी व वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वेण्णा, उरमोडी, निरा नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात मंगळवारी जोरदार वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, खंडाळा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे ओढे, नदी, नाल्यांना पूर आले आहेत, तर पूर्व भागात पावसाची उघडझाप होती. पश्चिमेकडे संततधार कायम असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होवू लागली आहे. कण्हेर धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सांडव्यातून 4 हजार क्यूसेक तर विद्युतगृहातून 500 क्यूसेक असे मिळून 4 हजार 500 क्यूसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे वेण्णा नदीवरील हमदाबाज-किडगाव पूल व करंजे-म्हसवे पूल पाण्याखाली गेल्याने या गावातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

उरमोडी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातूनही दुपारी 12 वाजल्यापासून 500 क्यूसेक विसर्ग उरमोडी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. उरमोडी नदीत धरणातून पाणी सोडल्यामुळे पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडत असल्याने सकल भागासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ठिकठिकाणी शेताचे तळे निर्माण झाले आहे. सतत पाऊस लागून राहिल्याने शेतीला वाफसा नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत, तर पश्चिम भागात धूळवाफेवर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे तेथील पिकांची उगवण क्षमता चांगली आहे. मंगळवारी सातारा जिल्ह्यात सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 12.7 मि.मी., जावली 46.6 मि.मी., पाटण 27.3 मि.मी., कराड 10.4 मि.मी., कोरेगाव 7.4 मि.मी., खटाव 2.7 मि.मी., माण 1.4 मि.मी., फलटण 0.7 मि.मी., खंडाळा 5.7 मि.मी., वाई 17.2 मि.मी., महाबळेश्वर 95.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.

वीर धरणातून विसर्ग वाढवला

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे. यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दि. 24 रोजी सायंकाळी 6 वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 20 हजार 960 व विद्युतगृहाद्वारे 1400 असा एकूण 22 हजार 360 क्युसेक विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गा मध्ये आवश्यक तो बदल करण्यात येईल. यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलवण्यात यावेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news