

सातारा : वारस नोंदणी केल्यानंतर त्याबदल्यात २५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महिला तलाठी अर्चना रामचंद्र गावडे (वय ४०, रा. मलकापूर, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार यांचे चचेगाव, ता. कराड येथील ग्रामपंचायतीमध्ये काम होते. तक्रारदार यांच्या आजीचा मृत्यू झाला आहे. यामुळे तिच्या दोन्ही मुलांची नावे वारस म्हणून नोंद करायची होती. यासाठी तक्रारदार हे तलाठी यांना भेटले. दि. ७ एप्रिल रोजी तलाठी यांनी वारसा हक्काची नोंद घेतली. सातबारा वरून आजीचे नाव कमी करून त्यावरही दोन्ही मुलांच्या नावाची नोंद केली. या केलेल्या कामाबद्दल महिला तलाठी यांनी २५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबीमध्ये तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक शैला कोरडे यांनी तक्रार घेऊन तपासाला सुरुवात केली. दि. २ जून रोजी पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले. लाचेची रक्कम बुधवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा लावला. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी विभागाने रंगेहाथ कारवाई केली. कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला अधिकार्याचा श्रीगणेशा
एसीबीच्या डीवायएसपी शैला कोरडे यांनी चारच दिवसांपूर्वी सातारा विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे. सातार्यात येताच त्यांनी पहिली कारवाई केली. तक्रारदार यांच्यापर्यंत पोहोचून कारवाई करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे. दरम्यान, शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, एजंट कोणीही लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.