FDA Warning: तळणीनंतर काळे खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान; 'एफडीए'कडून कारवाईचा इशारा

सातारा जिल्ह्यात खाद्यतेल भेसळीचा 'खेळ'
food oil adulteration
food oil adulteration
Published on
Updated on

सातारा : अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेलाच्या गुणवत्तेकडे मोर्चा वळवला असून सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र' या मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यातील खाद्यतेलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येत आहे. नोंदणी नसलेले खाद्यतेल उत्पादक, खाद्यतेलातील भेसळ, मुदत संपलेल्या तेलाचे रिपॅकिंग करणे, तळणीनंतर काळे झालेले तेल पुन:पुन्हा वापरले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाद्यतेल उत्पादक, वितरक, किरणा दुकानदार तसेच हॉटेल व्यवसायिक व खाद्य पदार्थ विक्रेते अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे खाद्यतेल उत्पादक व अन्न पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात किराणा दुकाने, हॉटेल्स, खानावळी, अल्पोपहार केंद्रे, खाद्यपदार्थ उत्पादक व्यवसाय आहेत. या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या गुणवत्तेची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या खाद्यतेलाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा 'एफडीए'ने दिला आहे. मोहरीच्या तेलाबाबत प्रशासनाने स्पष्ट धोरण जाहीर केले आहे. मोहरीचे तेल 100 टक्के मोहरीचे तेल म्हणूनच विकले पाहिजे. त्यामध्ये इतर खाद्यतेलाची भेसळ करून ग्राहकांची दिशाभूल केल्यास कारवाई होणार असल्याने सातारा जिल्ह्यातील खाद्यतेल विक्रेत्यांनी तेलाचा प्रकार, उत्पादकाची माहिती आणि पॅकिंगवरील लेबल काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

खाद्यतेलाची सुट्ट्या स्वरूपात विक्री करण्यास नियमांनुसार निर्बंध आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी उत्पादक किंवा वितरकांकडून सुट्टे खाद्यतेल खरेदी करून ग्राहकांना विकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पॅकबंद तेलाची विक्री करताना लेबल, सील, उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख यांची माहिती स्पष्ट असणे आवश्यक आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भजी, वडे, समोसे, फराळाचे पदार्थ आणि इतर तळलेले खाद्यपदार्थ विकले जातात. त्यामुळे हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून तळणीसाठी वापरल्या जाणार्‍या तेलाकडे प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. दूध भेसळीविरोधातील कारवाईनंतर खाद्यतेलाच्या तपासणीचा मुद्दा पुढे आल्याने सातारा जिल्‍ह्यातही व्यापक मोहिम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरी व ग्रामीण भागातील किरणा दुकाने, घाऊक बाजारपेठा, हॉटेल्स, अल्पोपहार केंद्रे, खानावळी, खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेते, ऑनलाईन तेल विक्रेते यांच्याकडील तेलाची गुणवत्ता तपासणे आवश्यक झाले आहे.

पॅकबंद तेल घेताना ब्रँड, लेबल, सील, उत्पादन तारीख, मुदत समाप्तीची तारीख आणि अन्य आवश्यक माहिती तपासून खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दूध भेसळीच्या कारवाईनंतर आता निकृष्ट खाद्यतेल रडारवर आल्याने सातारा जिल्ह्यातील भेसळखोरांमध्ये खळबळ माजली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news