

सातारा : खरीप व रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना खते, बी, बियाणे औषधांची माहिती अचूक आणि वेळेत मिळावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून तालुकानिहाय खत उपलब्धतेचा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. शेतकर्यांनी घर बसल्या क्यू आर कोड स्कॅन केल्यास कोणत्या दुकानात कोणते खत व औषधे उपलब्ध आहेत, याची माहिती या माध्यमातून मिळणार आहे.
माहिती व तंत्रज्ञानाच्या जमान्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आता हायटेक होवू लागला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकर्यांना शेतीबाबत नवनवीन उपक्रम व तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. या ब्लॉगमधून खतांचे प्रकार, त्यांचे उपयोग, माती परीक्षण आणि खतांचा योग्य वापर कसा करावा, जमिनीसाठी योग्य खताची निवड, खतावरील अनुदान आणि योजनांची माहिती, खतांचा पुरवठा आणि उपलब्धता, खताबद्दलच्या शकांचे निरसनही केले जाणार आहे. यामुळे शेतकर्यांचे दुकानात होणारे हेलपाटे वाचणार आहे.
खरीप व रब्बी हंगामात शेतकर्यांसाठी डिजिटल सुविधा म्हणून तालुकानिहाय खत उपलब्धतेचा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे तालुकानिहाय खतांचा साठा असणार आहेत. तसेच तालुक्यातील विक्री केंद्रनिहाय साठा माहिती (गोण्यामध्ये), प्रत्येक खत विक्रेत्यांकडे किती गोण्या शिल्लक आहेत. याची अचूक माहिती आता शेतकरी मोबाईलवरून घरी बसूनच पाहू शकतील. ब्लॉग पाहण्यासाठी https://ad0zpsatara2025.blogspot.com/2025/06/boX-sizing-border-box-margin-o-padding.html ही लिंक किंवा क्यू आर कोड स्कॅन करावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.