Satara farmers: पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई ; स्त्रोत आटल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
Satara farmers: पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Published on
Updated on

मारूल हवेली : मान्सून सुरू होण्यास अद्याप अवधी असतानाच यंदा ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच ओढे, नाले आणि बंधारे आटल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून पिके जगविताना मोठी कसरत करावी लागत आहे. वळीव पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

गेल्या सात-आठ वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने भूजल पातळी सतत खालावत चालली आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याने मे महिन्यापूर्वीच रानावनातील लहान-मोठे ओढे, नाले आणि बंधारे कोरडे पडले आहेत. पशुपक्षांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या अनेक विहिरींमध्ये दिवसातून अवघा एक ते दीड तास पाणी पुरेल एवढेच पाणी साचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मर्यादित वेळेतच पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी विद्युत पंप अर्धा ते एक तासच चालत असून दोन-तीन सऱ्यांपुरतेच पाणी मिळत आहे. 40 फूट खोल असलेल्या विहिरी 60 फूटांपर्यंत खोदूनही पाण्याची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे.

नदीवरील लिफ्ट इरिगेशन योजनांच्या परिसरातील काही विहिरींना अद्याप पाझर टिकून असल्याने तेथील शेतकरी कसाबसा तग धरून आहे. मात्र इतर भागांतील विहिरींनी तळ गाठल्याने शेती संकटात सापडली आहे. विशेषतः माळरान आणि हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. ऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र पाणीटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांची ऊस पिके पिवळी पडू लागली आहेत. काही शेतकऱ्यांनी तासावर भाड्याने पाणी घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news