

उंडाळे : ३२९० शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असून याद्वारे कराड तालुक्यातील २१ कोटी ६ लाख रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे. अद्यापही १०४६ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणे बाकी आहे. या शेतकऱ्यांची सुमारे १२ कोटी ८८ लाख कर्जमाफी होणार आहे. शिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या सुमारे ७० हजार नियमित शेतकऱ्यांना मात्र शासनाकडून अद्याप ठेंगाच मिळाला आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरून आम्ही चूक केली का असं संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित झाला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व त्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी शासनाकडून गत वर्षी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र घोषणा होऊन वर्ष उलटले तरी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेचे कामकाज नेमके कधी पूर्ण होणार नि शेतकऱ्यांना व दुसरीकडे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना जाहीर केलेले प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहे. आज कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला जवळपास वर्ष पूर्ण होत आले असून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीच्या याद्या येत आहेत. त्या पूर्ण केव्हा होणार याचीही प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. तालुक्यात एकूण ४३३४ कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ झाला आहे. तर ५० हजारांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ. सुमारे ७० शेतकऱ्यांना होणार आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणीची लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची नितांत गरज आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या थकीत कर्जदारांसह नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने तातडीने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक ओढाताण सहन करून बँकांचे कर्ज वेळेत भरले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.