

सातारा : पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या सातजणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. सर्व संशयित सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे. या कारवाईत २ कार, ८ मोबाईल, रोख रक्कम असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विकास दत्तात्रय शिंदे (२४, रा. नागाव रस्ता, ता. वाळवा), वैभव पांडुरंग पवार (३३, रा. इनाम धामणी, मिरज), राहुल सुनील पाटील (२८, रा. इनाम धामणी, मिरज), केतन बाबासाहेब महाजन (३३, रा. शामरावनगर, मिरज), प्रियांका रणदिप नाईक (३२, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर), प्रियांका संजय भोरे (३५, रा. मंगळवार पेठ, मिरज), अरुणा दयानंद आवळे (वय ४१, रा. म्हैसाळ वेस, मिरज, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
१३ जुलै रात्री वर्धनगड येथे पेट्रोल पंपाजवळ संशयितांनी पोलिस असल्याचे भासवून बॅरेकेटिंड लावून वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. याबाबत पुसेगाव पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली. खर्या पोलिसांना पाहताच हे भामटे पोलिस पळून जाऊ लागले. यावेळी पुसेगाव पोलिसांनी सर्वांना पकडले. चौकशीत संबंधित व्यक्ती पोलीस खात्यात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले.
५०० रुपये प्रमाणे पैसे उकळले
पुसेगाव पोलिसांनी तोतया पोलिसांचा बुरखा फाडल्यानंतर त्यावेळी घटनास्थळी थांबवण्यात आलेल्या २ दुचाकीस्वारांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्याकडून ५०० रुपये घेतले आहेत. सर्व प्राथमिक चौकशी केली असता संशयितांनी पोलिस असल्याची खोटी बतावणी करून वाहनचालकांकडून खंडणी उकळल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व मुद्देमाल जप्त केला. संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.