Maharashtra budget 2026: साताऱ्याचा दबदबा बजेटमध्ये दिसणार का?

एक उपमुख्यमंत्री व चार मंत्री जिल्ह्याचे
Maharashtra budget 2026
Maharashtra budget 2026: साताऱ्याचा दबदबा बजेटमध्ये दिसणार का?Pudhari
Published on
Updated on
हरीष पाटणे

सातारा : साताऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यमंत्रिमंडळात चार मंत्री साताऱ्याचे आहेत. हे चारही मंत्री आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याला काय मिळवून देणार? उपमुख्यमंत्रीही साताऱ्याचे असल्याने जिल्ह्याचा राजकीय दबदबा बजेटमध्येही दिसणार का? सातारा जिल्ह्याच्या विकासाचे व आपल्या मायभूमीच्या समृद्धीचे दार हे मंत्री बजेटमधून उघडलेले दाखवणार का? याविषयी सातारा जिल्ह्यात उत्सुकता लागून राहिली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात इतिहासात प्रथमच सातारा जिल्ह्याचे एकाच वेळी चार मंत्री आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे भाजपमधून, पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई शिवसेनेतून तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्रीमंडळात आहेत. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सातारा जिल्ह्याचे आहेत. एकाचवेळी मंत्री मंडळात असलेले हे मंत्री सातारा जिल्ह्यासाठी काय करणार? याविषयी उत्सुकता आहे.

राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होत आहे. अर्थसंकल्पाकडून साताऱ्याला कायमच अपेक्षा राहिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा जिल्हा अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्याला पुढे न्यायचे असेल तर व्हिजन असणारे मंत्री जिल्ह्याचा कायापालट करू शकतात. सुदैवाने चार मंत्री सातारा जिल्ह्याचे असल्याने अर्थसंकल्पात साताऱ्याचा दबदबा असायला हवा. अनेक विकासाच्या प्रकल्पांना बजेटमध्ये स्थान हवे. प्रलंबित प्रकल्पांची सोडवणूक बजेटमधून व्हायला हवी, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील जनतेची आहे.

त्यादृष्टीने सातारा जिल्ह्यातील जनता बजेटकडे पहात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर सातारा जिल्ह्यातील दरेचे आहेत. ते सातत्याने गावाकडे असतात. त्यामुळे मातृभुमीच्या विकासासाठी त्यांच्याकडूनही प्रचंड अपेक्षा आहेत. सातारा जिल्ह्याचा प्रलंबित विकास साधायचा असेल तर चारही मंत्र्यांनी अर्थसंकल्पात आपली ताकद दाखवायला हवी. त्यादृष्टीने बजेटकडून जिल्हावासियांच्या अपेक्षा आहेत.

साताऱ्याला आठवण अजितदादांची...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने साताऱ्याला झुकते माप दिले होते. साताऱ्याचे मेडिकल कॉलेज, हद्दवाढ, कास धरणाची उंची वाढवणे अशा वैविध्यपूर्ण प्रकल्पांना अजितदादांनी अर्थसंकल्पात स्थान दिले होते. पर्यटनाच्या अनेक प्रकल्पांना त्यांनी बजेटमधून निधी मिळवून दिला होता. अजितदादांचा अर्थसंकल्प साताऱ्यासाठी कायमच छप्पर फाडके राहिला. मात्र, अजितदादांच्या निधनामुळे आता साताऱ्याकडे दुर्लक्ष होणार का? याचीही चिंता सातारा जिल्हावासीयांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news