

सातारा : सातारा शहरचे पाच पोलिस. लखनचा साथीदार अमर केरी याच्या पहिल्या मुसक्या आवळल्या. लखन समोर येताच एका पोलिसाने अमरचा ताबा घेतला. लखनच्या मागे दोन पोलिस पळाले. लखनचे कुटुंबिय अन्य साथीदार येवू नये म्हणून एका पोलिसाने दरवाजांना बाहेरुन कड्या लावल्या. पोलिस अधिकारी या सर्व पोलिसांना कव्हर देत होते. अशातच लखनने धापा टाकत पोलिसांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यातून स्वसंरक्षणार्थ गोळी झाडून काम तमाम केले.
पिक्चरला लाजवेल अशी थरारक कारवाई करत कुख्यात गुन्हेगार, कोयता गँगचा म्होरक्या, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडणार्या लखन उर्फ महेेश पोपट भोसले (32, रा. जयरामस्वामी, वडगाव ता.खटाव) याचा सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला. वास्तवीक पाच पोलिसांनी अशक्यप्राय असणारी कामगिरी केली आहे. कारण लखन शिक्रापूर जि.पुणे येथे त्याच्या कुटुंबियासोबत राहत होता. प्राथमिक माहितीनुसार सात ते आठजण त्यांचे कुटुंबिय तेथे आहेत. याशिवाय साथीदार अजय केरी. पोलिस मात्र पाचजणच होते. अशा या आठजणांना सातारचे पाच पोलिस भारी पडले. थोडीशीही चूक, नियोजनाचा अभाव राहिला असता तर पोलिसांच्या जिवावरच बेतणारे ठरले असते.
लखन भोसले कुख्यात असल्याने पोलिस त्याच्या मोडस ऑपरेंडीबद्दल सावध होते. कारण लखन याच्यावर 22 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो प्रतिकार करु शकतो, याचा अंदाच सर्वच पोलिस बाळगून आहेत. सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील (डीबी) सपोनि शामराव काळे, पोलिस सुजीत भोसले, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने हे पोलिसांचे पथक शिक्रापूर येथील मलठण फाटा येथे पोहचले. लखन त्या परिसरात वास्तव्य करत होता. पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यानंतर अमर केरी हा लखनचा साथीदार पोलिसांच्या पहिल्यांदा हाती लागला.
पोलिसांनी अमर केरी याला बोलते केल्यानंतर त्याने सातार्यात चार दिवसांपूर्वी लखन भोसले याच्यासोबत कोयत्याचा धाक दाखवून चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक बोलते केल्यानंतर लखन तेथेच विटभट्टी परिसरात असल्याचेही सांगितले. यामुळे पोलिस पुन्हा अधिक सावध झाले. अमर केरी याचा ताबा पोलिस मनोज गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. पोलिसांची ही कार्यवाही सुरु असतानाच लखन भोसले तेथे आला. पोलिसांना पाहताच तो पळत सुटला. त्याच्या कालव्याने त्याचे कुटुंबिय बाहेर येवून गोंधळ घालू नये, यासाठी पोलिस मच्छिंद्र माने यांनी लखन भोसले याच्या घराकडे धाव घेतली व घराला बाहेरुन कडी लावली. यावेळी घरामध्ये सर्व कुटुंबिय होते.
लखन भोसले पळत सुटल्यावर त्याचा पोलिस सुजीत भोसले व पोलिस तुषार भोसले यांनी पाठलाग सुरु केला. प्रत्येक पोलिसाकडे जबाबदारी पडल्यानंतर सपोनि शामराव काळे यांनी या सर्व पोलिसांना कव्हर देण्यासाठी परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी तळ ठोकला.
लखन भोसले याच्याकडे हत्यार होते. मात्र अचानक पोलिस दिसल्याने तो बेसावध अवस्थेत होता. अवघ्या 20 मीटरच्या अंतरावर पोलिसांनी त्याच्यावर चित्त्यासारखी झडप मारली. लखनला सुरुवातीला पाठीमागून आवळण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांना त्याने लाथा-बुक्क्या मारत जवळ येवू दिले नाही. इथेच झटापटीला सुरुवात झाली.
वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार
एन्काऊंटरची घटना घडली तेथे रहिवासी नागरिकांची वर्दळ आहे. पोलिस-चोरट्यांमध्ये झटापट, आरडाओरड सुरु झाली. नागरिक आवाजाच्या दिशेने कानोसा घेत होते. यावेळी लखन भोसले पोलिसांवर हल्ला करत असल्याचे नागरिकांनी पाहिले. अशातच पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ फायरिंग केले. वर्दळीच्या फायरचा आवाज झाल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली.
पाठीला गोळी लागली...
पोलिस सुजीत भोसले यांच्यावर पहिले दोन वार झाल्यानंतर ते पाठीमागे फेकले गेले. तोपर्यंत पोलिस तुषार भोसले पुढे आले व त्यांच्यावर वार करण्यास लखन भोसले याने सुरुवात केली. लखन थांबत नसल्याचे पाहून व त्वेषाने कुकरीने हल्ला करत होता. हे पाहून पोलिस सुजीत भोसले यांनी बंदूक काढून थांबण्याचा इशारा केला. मात्र तरीही त्याने कुकरी उगारली. त्यावेळी हे पाहून लखन याला कंबरेत गोळी मारुन जखमी करण्याच्या उद्देशाने पोलिसाने फायर केला. मात्र त्याचवेळी लखन वाकला गेला आणि गोळी कंबरेच्या वरुन पाठीला लागली व रक्तबंबाळ होवून त्याचा मृत्यू झाला.
चौथा वार वाचवण्यासाठी फायर...
पोलिस लखन भोसले याला थांबण्यासाठी सांगत होते. मात्र पोलिसांच्या हाती लागायचे नाही या इराद्याने त्याने कुकरीसारखे धारदार हत्यार काढले. पोलिसांवर हल्ला केला तरच थांबतील या विचाराने लखनने सुजित भोसले या पोलिसावर दोन वार केले. यामुळे पोलिस तुषार भोसले यांनी लखन भोसले याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही वार केला. लखनला तरीही पोलिस सुजीत भोसले यांनी थांबण्याची विनंती केली. मात्र लखन चौथा वार करण्याचा प्रयत्न करताच पोलिस सुजीत भोसले यांनी बंदूक काढून फायर केला. अवघ्या 15 सेकंदामध्ये खेळ खल्लास झाला.