

सातारा : सातारा नगरपालिकेसाठी खा. उदयनराजे गटाचे 25, तर ना. शिवेंद्रराजे गटाचे 25 उमेदवार असा 25-25चा फार्म्युला मंजूर झाल्याचे खात्रीलायक वृत्त असून नगराध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजेंकडून मोठे बंधू उदयनराजेंना मान दिला जाईल, असे बोलले जात आहे; मात्र, उदयनराजेंच्या गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवेंद्रराजेंचा चालणारा असेल, अशी जोरदार चर्चा मंगळवारी सातारा शहरात सुरू होती.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव भाजपच्या राज्याच्या नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांच्या यादीतूनच समजणार असल्याचे संकेत आहेत. दोन्हीही राजे भाजपमध्ये असल्याने व कमळाच्या चिन्हावर निवडणुका होणार असल्याने मूळ भाजपमधील इच्छुकांना दोघांमधील जागा वाटपात समाविष्ट केले जाणार असल्याचे समजते. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या गटाचे काका धुमाळ, संग्राम बर्गे तसेच किशोर शिंदे, तर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाकडून अविनाश कदम, अमोल मोहिते आणि जयेंद्र चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
साताऱ्यात नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यानंतर भाजपकडून अधिकृत उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिलेले अर्ज मुंबईत प्रदेश कार्यकारिणीत पाठवण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी केल्यानंतर योग्य उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत दोन्ही राजेंची अंतिम समन्वय बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि प्रभागनिहाय नगरसेवकपदासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून साताऱ्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वच्छ नेतृत्व आणि एकसंघपणा दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. सातारा शहरातील मतदारांना आता ‘राजेंचा उमेदवार कोण?’ असेल याची उत्सुकता आहे.
उदयनराजे गटाकडून काका धुमाळ, संग्राम बर्गे व किशोर शिंदे यांची नावे प्रदेशला पाठवण्यात आली आहेत तर शिवेंद्रराजे गटाकडून अविनाश कदम, अमोल मोहिते व जयेंद्र चव्हाण ही नावे पाठवण्यात आली आहेत. काका धुमाळ हे उदयनराजेंचे कट्टर समर्थक व लोकसभा निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाचे घटक म्हणून कार्यरत होते. शिवेंद्रराजेंनाही हे नाव चालू शकते. संग्राम बर्गे हे उदयनराजेंच्या संघटनेतील सक्रिय कार्यकर्ते व युवा वर्गामध्ये लोकप्रिय असलेले नाव आहे. स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते मात्र शिवेंद्रराजेंचा गट त्यांच्या विरोधात असल्याची साताऱ्यात चर्चा आहे. किशोर शिंदे हे कट्टर उदयनराजेनिष्ट म्हणून ओळखले जातात. नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव असलेले पहिल्या फळीतले नेते म्हणून किशोर शिंदे हे नाव घेतले जाते.
मात्र, शिवेंद्रराजेंकडून या नावाला होकार मिळेल का? याविषयीही चर्चा सुरू आहेत. शिवेंद्रराजे यांच्या आघाडीतून अविनाश कदम, अमोल मोहिते व जयेंद्र चव्हाण ही नावे प्रदेशला पाठवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही यापूर्वी साताऱ्याचे उपनगराध्यक्ष राहिले आहेत. त्यांना नगरपालिका प्रशासनाचा अनुभव आहे आणि तिघांनीही शिवेंद्रराजे ठरवतील तो निर्णय मान्य असेल, अशी भूमिका घेतली आहे. जर शिवेंद्रराजेंनी स्वत:च्याच आघाडीचा नगराध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला तर यापैकी कुणाला संधी द्यायची यात शिवेंद्रराजेंचा कस लागणार आहे. या तिघांपैकी अविनाश कदम व अमोल मोहिते यांना त्यांच्या त्यांच्या वॉर्डातून नगरपालिकेत नगरसेवक म्हणून येण्याची संधी आहे.
मात्र, जयेंद्र चव्हाण यांचा वॉर्ड राखीव झाल्याने नगराध्यक्षपदाची संधी मिळाली नाही तर चव्हाण हे नगरपालिकेच्या आखाड्यातून बाजूला जावू शकतात. कट्टर भाजपनिष्ठ म्हणून धनंजय जांभळे, सुवर्णा नरेंद्र पाटील, अमित कुलकर्णी यांच्य नावाची जरी चर्चा सुरू असली तरी ही नावे प्रदेशला गेली आहेत का याबाबत खात्रीशीर माहिती कुणीही सांगत नाही.