Satara Elections: सात जणांना बिनविरोधची लॉटरी

छाननीदरम्यान गरमागरमी; अर्ज माघारीला सुरुवात
Local body elections
Local body elections(File Photo)
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या सात उमेदवारांना बिनविरोधची लॉटरी लागली आहे. यामध्ये मलकापूरचे पाच, वाई आणि सातारा पालिकेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. मंगळवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी विरोधी उमेदवाराचे अर्ज अवैध ठरल्याने सहा जणांना बिनविरोधची लॉटरी लागली असून एक उमेदवार कालच बिनविरोध झाला आहे. छाननीवेळी अनेक ठिकाणी घेतलेल्या आक्षेपामुळे गरमागरमीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरूवात झाली असून अंतिम मुदत शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर ही आहे.

जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, मलकापूर या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीसाठी धुमशान सुरू आहे. मंगळवारी या सर्व ठिकाणी छाननीची प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी आक्षेप नोंदवताना हमरीतुमरीवर विषय गेला. काहींना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता आल्याने निवडणूक रणांगणातून आऊट व्हावे लागले. रात्री उशीरापर्यंत काही ठिकाणी ताणतणावाची स्थिती होती.

मलकापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे हणमंतराव जाधव, सुनीता पोळ, दीपाली पवार, ज्योत्स्ना शिंदे, सुनील खैरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. पालिकेच्या 22 जागांपैकी 5 ठिकाणी भाजपने बिनविरोध बाजी मारल्याने भाजपसाठी ही निवडणूक अधिक सोपी झाली. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग 20 मधून भाजपतर्फे निवडणूक लढणाऱ्या आशा पंडित या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधातील उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरल्याने त्यांना संधी मिळाली. तर वाई नगरपालिकेत प्रभाग 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार रेखा जाधव या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

सातारा पालिकेत नगराध्यक्षपदाचे 17 अर्ज वैध ठरले तर नगरसेवकपदाचे 316 उमेदवारी अर्ज वैध ठरले. रहिमतपूर नगरपालिकेत एबी फॉर्म नसल्याने एकूण 9 अर्ज बाद ठरले. तर 51 अर्ज निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. मलकापुरात नगराध्यक्षपदासाठी भरलेल्या एकूण 15 उमेदवारी अर्जांपैकी 11 अर्ज बाद ठरले आणि चार रिंगणात उरले. नगरसेवक पदासाठी 134 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 79 बाद ठरले तर 55 निवडणूक रिंगणात राहिले आहेत. वाईमध्ये नगराध्यक्षपदाचा एक आणि नगरसेवकपदाचे 16 असे एकूण 17 अर्ज बाद झाले. नगराध्यक्षपदासाठी 8 अर्ज उरले. तर तर नगरसेवकपदाच्या 105 अर्जांपैकी 89 अर्ज वैध ठरले.

फलटणमध्ये नगरसेवकपदाचे 85 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. 110 उमेदवार रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्षपदाच्या 8 उमेदवारांपैकी चार अर्ज अवैध ठरले आहेत. म्हसवड पालिका नगराध्यक्ष पदाच्या लढतीत आता पाच महिला निवडणुकीच्या रिंगणात राहिल्या आहेत, तर 4 महिलांचे अर्ज अवैध ठरले आहेत. पाचगणीत नगराध्यक्षपदाचे 8 तर नगरसेवकपदाचे 116 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news