

सातारा : जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एका नगपंचायतीसाठी त्वेषाने उभ्या राहिलेल्या 1 हजार 726 उमेदवारांपैकी तब्बल 1 हजार 53 उमेदवारांनी ऐन रणांगणात तलवारी म्यान केल्या. आता नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांसाठी एकूण 759 जण भिडले आहेत. सातारा वगळता कराड, फलटण, म्हसवड, वाई, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीत महायुतीच्या घटक पक्षांतच घमासान होणार असल्याचे स्पष्ट झाले.
काही ठिकाणी दुरंगी, तर अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होणार आहेत. महायुतीमध्ये विस्फोट झाल्याचे चित्र असून, महाविकास आघाडीनेही ठिकठिकाणी बळ एकवटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने चार मंत्र्यांसह खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सातारा पालिकेत नगराध्यक्षपदासाठी 18, तर नगरसेवकपदाच्या 50 जागांसाठी विक्रमी 320 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीनंतर आता नगराध्यक्षपदासाठी 9, तर नगरसेवकपदासाठी 169 उमेदवारी रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमधून माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, शिवाजी भोसले, बाळासाहेब शिंदे, अशोक मोने, सुहास मोरे यांनी माघार घेतल्याने अमोल मोहिते (भाजप), सुवर्णादेवी पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट), शरद काटकर, सनी काटे, रवींद्र भणगे, गणेश भिसे, सागर भिसे, सुधीर विसापुरे, अभिजित बिचुकले हे नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
कराडात नगरसेवकपदाच्या 31 जागांसाठी 109 जण रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी 9 जणांनी शड्डू ठोकला आहे. त्यामध्ये राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी व लोकशाही विकास आघाडी), विनायक पावसकर (भाजप) व झाकिर पठाण (काँग्रेस), रणजित पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
वाई नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार, तर नगरसेवकपदाची एक जागा बिनविरोध झाली असून, उर्वरित 22 जागांसाठी 62 उमेदवार रिंगणात उरले आहेत. सर्वपक्षीय 20 उमेदवारांनी माघार घेतली आहे. भाजपमधून अनिल सावंत, राष्ट्रवादीतून डॉ. नितीन कदम, तर काँग्रेसमधून प्रदीप जायगुडे व अपक्ष उमेदवार दीपक जाधव नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीतून तेजपाल वाघ व शिवसेनेचे प्रवीण शिंदे, भाजपचे विजय ढेकाणे यांनी नगराध्यक्षपदाच्या रेसमधून आश्चर्यकारकरीत्या माघार घेतली आहे.
फलटण नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी 78 उमेदवार रिंगणात उरले आहेत. बहुतेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती होणार असून, 31 जणांनी माघार घेतली आहे. फलटण नगराध्यक्षपदासाठी आता आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक-निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. 27 नगरसेवकांच्या जागेसाठी 76 जण रिंगणात राहिले आहेत. बहुतेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी सामना रंगणार आहे.
रहिमतपूर पालिकेच्या 20 जागांसाठी 65 जण रिंगणात उतरले होते. माघारीनंतर 40 जण रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. आता नंदना माने (राष्ट्रवादी व मित्र पक्ष) विरुद्ध वैशाली माने (भाजप) अशी दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदासाठीही समोरासमोर दुरंगी लढत होणार असल्याने रहिमतपूर पालिकेच्या निवडणुकीत टस्सल निर्माण झाली आहे.
म्हसवडला नगराध्यक्षपदाच्या 2 उमेदवारांनी माघार घेतल्याने पूजा वीरकर (भाजप), भुवनेेश्वरी राजेमाने (राष्ट्रवादी व मविआ), रूपाली सरतापे (बसपा) या तिघी रिंगणात उरल्या आहेत. नगरसेवकपदाच्या 20 जागांसाठी आता 46 उमेदवार उरले असून, काही प्रभागांत दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत.
मलकापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप असा तिरंगी सामना रंगणार आहे. भाजपतर्फे तेजस सोनावले, राष्ट्रवादी व समविचारी पक्षांतर्फे आर्यन कांबळे व शिवसेनेतर्फे अक्षय मोहिते यांची उमेदवारी कायम असून, काँग्रेसचे संजय तडाखे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर नगरसेवकपदाच्या 16 जागांसाठी 35 जण, तर नगराध्यक्षपदासाठी तीनजण रिंगणात उरले आहेत.
महाबळेश्वरात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
महाबळेश्वरात अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमयरीत्या घडामोडी घडल्या असून, नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवकांसाठी 61 जण नशीब अजमावत आहेत. नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नासीरभाई मुलाणी यांची समजूत काढण्यात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांना यश आले. ना. पाटील यांच्या शिष्ठाईमुळे मुलाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक सुनिल शिंदे, लोकमित्र जनसेवा आघाडीकडून माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर व अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक कुमार शिंदे अशी ही तिरंगी लढत असेल. काही प्रभागांमध्ये दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती लक्षवेधी ठरणार आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या एकूण 20 जणांनी माघार घेतली आहे.
पाचगणीचे थंड वातावरण 8 जणांच्या शड्डूने तापले
पाचगणीत 20 जागांसाठी 118 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. माघारीनंतर 75 जण रिंगणात उरले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी 8 जण शड्डू ठोकून कायम आहेत. माजी उपनगराध्यक्ष दिलीप बगाडे यांना राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिल्याने बगाडे यांच्या उमेदवारीला अचानक गती मिळाली आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कांबळे, त्यांचे बंधू दिपक कांबळे, सुनील बगाडे, सुनील कांबळे, विजय वन्ने, दास चावरिया आणि अमोल सावंत हेही रिंगणात असून पाचगणीचे थंड वातावरण चांगलेच तापले आहे.
मेढ्यात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या दोन नगरसेविका बिनविरोध झाल्या आहेत. तर नगराध्यक्ष पदामध्ये भाजपा व शिवसेना दोघांत जोरदार टस्सल होणार असल्याचे चित्र शुक्रवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार रुपाली वारागडे व शिवसेनेच्या (शिंदे गट) रेश्मा करंजेकर या दोन प्रबळ उमेदवार असून राष्ट्रवादीच्या सुनिता पार्टे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला तर अपक्ष म्हणून माजी नगरसेविका शुभांगी गोरे यांचा अर्ज राहिला आहे. नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 41 जण रिंगणात आहेत.