

सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, तरीही नगराध्यक्षांकडून उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकपदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. या निवडी रखडल्याने पुढील सभापती निवडीही लटकल्या आहेत. उपनगराध्यक्ष तसेच विषय समित्या गठित करून सभापती निवडी न झाल्याने कारभार कोलमडला आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या राजकीय वर्तुळात व सातारकरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पदाधिकारी निवडी नेमक्या कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर झाला. नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीनुसार उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभा बोलावणे आवश्यक असते. या सभेसाठी नगराध्यक्षांकडून सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका (अजेंडा) काढली जाते आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत मतदान किंवा सहमतीने या पदाधिकारी निवडी पार पाडल्या जातात. मात्र, निकाल जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप सर्वसाधारण सभेला मुहूर्त न सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सभाच न झाल्याने उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदांच्या निवडी रखडल्या. यामुळे विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीही आपोआप लांबणीवर पडल्या आहेत. महिला व बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा, शहर नियोजन, विशेष मागासवर्गीय आदि विषय समित्यांच्या सभापतींची निवड ही नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची असते. सभापती निवडीसोबतच या समित्यांमध्ये काम करणारे सदस्यही निश्चित केले जातात. मात्र, या सर्व प्रक्रिया सध्या थांबलेल्या आहेत.
नगरपालिकेतील प्रशासनिक कामकाज तातडीने सुरू होण्यासाठी पदाधिकारी निवडी आवश्यक असताना या विलंबामुळे नगरपालिका यंत्रणा अर्धवट स्थितीत कार्यरत आहे. प्रशासकीय कार्यकाळ संपुष्टात आला असताना पदाधिकारी निवडीस विलंब होत असल्याने शहरातील कामकाज विस्कळीत झाले आहे. त्याचा विकासावरही परिणाम होत असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना अद्याप भूमिका व जबाबदाऱ्या न दिल्याने निर्णय प्रक्रियेत मर्यादा येत आहेत. उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीबाबतचा निर्णय लांबत चालल्याने आता सातारकरांचे लक्ष नगराध्यक्षांकडून सर्वसाधारण सभा केव्हा बोलावली जाते? याकडे लागले आहे. विकासकामे, कामांचे नियोजन आणि प्रशासकीय निर्णय यासाठी पदाधिकारी आवश्यक असल्याने ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नगराध्यक्षांकडून सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका कधी जाहीर होते आणि त्यातून उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी कधी होतात, यावर पुढील राजकीय हालचाली ठरणार आहेत.