

सातारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा सुमारे 1 कोटीहून अधिक रुपयांचा निवडणूक भत्ता पोलिसांना मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरेसे अनुदान प्राप्त झाले नसल्याची कबुलीही तहसीलदार कार्यालयातून देण्यात आल्याने ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, वरिष्ठ निवडणूक विभागाकडून मात्र पोलिसांचा भत्ता देण्याच्या सूचना कनिष्ठ निवडणूक विभागाला देण्यात आल्या आहेत. यामुळे नेमके घोडे कुठेे पेंड खाते? असा सवाल उपस्थित झाला आहे.
लोकसभा व विधानसभेची दर पाच वर्षांनी निवडणूक होत असते. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महसूल व पोलिस निवडणूक बंदोबस्ताचा व संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेवून प्लॅनिंग केले जाते. या सर्व प्रक्रियेसाठी पोलिसांची ड्युटी 24 तास सुरु असते. एफएसटी, एसएसटी सारखी विविध पथके, गस्त पथके, तैनात केली जातात. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी, कर्मचारी यांना कामाचा मोबदला म्हणून निवडणूक आयोगाकडून रकमेच्या स्वरुपात भत्ते दिले जातात. एफएसटी पथक म्हणजे फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड टीम) होय. हे पथक निवडणुकीच्या वेळी अवैध किंवा गैर-कायदेशीर गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी नियुक्त केलेले एक विशेष पथक आहे. हे पथक विशेषतः निवडणुकीच्या वेळी अवैध मतदानाची शक्यता, अवैध मतदानाची नोंदणी आणि इतर गैर-कायदेशीर गोष्टींवर लक्ष ठेवण्याचे काम करते. या पथकातील नियुक्त असलेल्या पोलिसांना सुमारे एक महिन्याहून अधिक काळ काम केले आहे. नियमानुसार सुमारे 26 हजार रुपये पोलिसांना भत्ता मिळायला पाहिजे होता. मात्र हा भत्ता पोलिसांना मिळालेला नाही.
एसएसटी पथक म्हणजे ‘स्टॅटीक सर्विंलन्स टीम’ अर्थात स्थिर सर्वेक्षण पथक होय. हे पथक निवडणुकीच्या वेळी मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्थापन केले जाते. हे पथक मतदानादरम्यान गैर-व्यवहार किंवा नियम-भंग होत असल्यास, त्याची नोंद घेते आणि आवश्यक कार्यवाही करते. या पथकामध्ये पोलिसांनी सुमारे 45 दिवस काम केले आहे. त्यानुसार 30 हजार रुपये एवढ्या रकमेचा भत्ता पोलिसांना मिळायला पाहिजे होता. मात्र तो मिळालेला नाही. दोन्ही पंचवार्षीक निवडणुकीतील ही रक्कम सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिक आहे.