Satara news | अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे रहा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

पालकांनी पाल्याच्या स्वप्नांना पाठिंबा द्यावा
Satara news | अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे रहा :  जिल्हाधिकारी संतोष पाटील
Published on
Updated on

सातारा : आजचे विद्यार्थी अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी आहेत. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे त्यांनी आतापासूनच निश्चित केले आहे. पालकांनी त्यांच्या या स्वप्नांना पाठिंबा द्यावा आणि शिक्षकांनीही त्यांच्या तयारीसाठी आतापासूनच मार्गदर्शन करावे. लक्षात ठेवा, यश किंवा अपयश हे अंतिम नसते. जर तुम्ही अपयशी ठरलात, तर त्याचा अर्थ आयुष्य संपले असा होत नाही. अपयशातून शिका आणि नव्या दमाने पुन्हा उभे राहा. आजची तरुण पिढी हे देशाचे भविष्य असून तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, तिचा योग्य वापर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 'कॉफी विथ कलेक्टर' या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी थेट आणि मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता जगताप यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

संतोष पाटील म्हणाले, यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे तुलनेने सोपे आहे. अभ्यासाची सुरुवात थोडी उशिरा केली तरी त्यात यश मिळवता येऊ शकते. मात्र, क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळ टिकून राहून पदक मिळवणे अत्यंत कठीण असते. ज्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांनी चिकाटीने मेहनत घेतली पाहिजे. यासाठी शालेय क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घ्यावी आणि पालकांनीही खेळाडू पाल्यांना खंबीर पाठिंबा द्यावा. शिक्षक हे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण आणि त्यांची आवड अचूक ओळखू शकतात. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या पाल्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर घडवण्यासाठी मदत केली पाहिजे.

क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांच्या मदतीने एक उत्तम क्रीडापटू घडू शकतो. या योजनांची माहिती व लाभासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जे विद्यार्थी क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रांत करिअर करत आहेत, त्यांनी जिल्हा, राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन व प्रशासन नेहमीच तुमच्या पाठीशी उभे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news